कोकणच्या भूमीला राणे विरुद्ध जाधव हा संघर्ष नवा नाही. आज (१६ फेब्रुवारी) पुन्हा एकदा गुहागरमध्ये हा संघर्ष पाहायला मिळाला. आमदार भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते निलेश राणे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरच्या तळी येथे सायंकाळी जाहीर सभा होणार होती. या सभेला विरोध करण्यासाठी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा आणि घरांच्या खिडक्या फुटल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलिसांना यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.
निलेश राणे यांचा ताफा सभास्थळी जात असताना भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आडवे आले. यावेळी भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांमधील हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटांकडून दगडफेक आणि घोषणाबाजी सुरू झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या.
दरम्यान, पोलिसांनी तळी भागात बंदोबस्त वाढवला आहे. रस्त्यांवर दगडांचा खच पडला आहे, गांड्या फुटलेल्या काचाही दिसत आहेत. पोलिसांनी अथक प्रयत्नांनतर जमाव पांगवला खरा, परंतु, अजूनही या भागात तणाव आहे. त्यामुळे पोलिसांनी भास्कर जाधव यांचं कार्यालय, निलेश राणे यांच्या सभेचं ठिकाण आणि इतर बंदोबस्त वाढवला आहे. सध्या कोकणातलं वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना चोप देणार असं वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली आहे.
वादाची सुरुवात कधी झाली?
आमदार भास्कर जाधव यांनी अलिकडेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेले माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांच्यावर सणसणीत टीका केली. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या मतदार संघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता त्यांची शृंगारतळी (ता. गुहागर) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
हे ही वाचा >> “…ती शरद पवारांची मोठी चूक”, अजित पवारांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “त्यांनी पक्षांतर्गत…”
गेल्या दोन तीन दिवसात आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे संतापलेल्या जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी बुधवारी चिपळूण पोलीसांना निवेदन देत नीलेश राणे यांची सभा रद्द करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी दुपारी नीलेश राणे गुहागरकडे जाण्यासाठी निघाले होते. साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान राणे यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्य चिपळुणातील कार्यालयासमोरुन जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. साधारण या पद्धतीचे पडसाद उमटण्याची कल्पना असल्याने पोलीस खात्यानेही तयारी केली असल्याचे दिसत होते. मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत धावपळीत सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.