शिवसेना खासदार विनायक राऊत यांना बोलण्याच्या ओघात चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच विसर पडला. विनायक राऊतांनी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा उल्लेख केला आणि राजकीय वर्तुळात टीका-टिपण्ण्या सुरु झाल्या. दरम्यान, यानंतर आता विनायक राऊतांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या राणे यांना टीकेची मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे, या प्रकारानंतर निलेश राणे यांनी आता विनायक राऊतांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून निलेश राणे यांनी विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
“शिवसेना खासदार विनायक राऊत यांना अद्याप माहिती नाही की राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. टोपी तरी धड घालायची. नव्वदच्या दशकात सिनेमा टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅक करणारे जी टोपी घालायचे तशीच घातली आहे”, असं म्हणत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, विनायक राऊत हे शनिवारी (२ सप्टेंबर) सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, प्रसारमाधम्यांशी बोलताना राऊत यांनी चक्क अशोक चव्हाण यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत याचा एका शिवसेना नेत्यालाच विसर पडला आहे, अशी टीका सध्या राज्यभर होत आहे. मोठ्या उलथापालथी आणि अनपेक्षित राजकीय घडामोडींनंतर स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना विनायक राऊत यांच्यासारख्या बड्या नेत्याला याचा विसर पडल्याने या विधानाची खिल्ली देखील उडवली जात आहे.