उद्योगमंत्री नारायण राणे व त्यांचे खासदार पुत्र नीलेश यांच्या मनमानीपणाला कंटाळलेल्या सामान्य कोकणी जनतेने लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा दीड लाख मतांनी धुव्वा उडवत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना विजयी केले.
या अभूतपूर्व दणक्यामुळे उद्विग्न होऊन राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवून दिला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत ८ लाख ९३ हजार २६४ (६५.७१टक्के) विक्रमी मतदान नोंदवण्यात आले. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालेली होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत विनायक राऊत यांना ४ लाख ९३ हजार ८८, तर मावळते खासदार नीलेश यांना ३ लाख ४३ हजार ३७ मते पडली. त्यामुळे राऊत दीड लाख मतांच्या फरकाने निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणातील अन्य आठ उमेदवारांपैकी बसपाचे राजेंद्र अहिरे (१३ हजार ८८ मते) व आम आदमी पार्टीचे अभिजीत हेगशेटय़े (१२ हजार ७०० मते) वगळता अन्य उमेदवार पाच आकडी संख्याही गाठू शकले नाहीत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीपासून उपलब्ध झालेल्या नकाराधिकाराचा (नोटा) तब्बल १२ हजार ३९३ मतदारांनी वापर केल्याचे स्पष्ट झाले.
मागील लोकसभा निवडणुकीत (२००९) शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांचा ४६ हजार मतांनी पराभव करीत नीलेश राणे निवडून आले. त्या वेळी त्यांना या मतदारसंघातील चिपळूण,
रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या पाच विधानसभा मतदारसंघांमधून मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र सहाही मतदारसंघांनी महायुतीचे राऊत यांना घसघशीत आघाडी मिळवून दिली. या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघाने सर्वात जास्त, सुमारे ४१ हजार मतांची आघाडी मिळवून दिली. त्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राऊत यांनी सुमारे ३१ हजार मतांची आघाडी मिळवली. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या राजापूर मतदारसंघाने सुमारे २२ हजारांचे मताधिक्य दिले, तर सेनेचे दुसरे आमदार सदानंद चव्हाण यांच्या चिपळूण मतदारसंघातून सुमारे ३१ हजार मतांची आघाडी मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: राणे विजयी झालेल्या कुडाळ मतदारसंघानेही या निवडणुकीत राऊत यांना सुमारे २१ हजार मतांची आघाडी मिळवून दिली. तसेच गेल्या निवडणुकीत नीलेश यांना सुमारे २६ हजाराचे मताधिक्य देणाऱ्या कणकवलीनेही राऊतांच्याच बाजूने, नाममात्र का होईना, (१३७७ मते) कौल दिला. या पराभवाला राणे यांच्याविरोधात महायुतीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पदाधिकाऱ्यांचा उघड विरोध मुख्यत्वे कारणीभूत ठरला असला तरी एकूणच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, राज्यमंत्री सामंत व अन्य कार्यकर्त्यांची उदासीनताही जबाबदार असल्याचे मानले जाते. पण या सर्वापेक्षाही कोकणच्या या दोन्ही जिल्ह्य़ांमधील सर्वसामान्य कोकणी माणसाने राणे पिता-पुत्रांच्या मनमानीपणाला वैतागून राऊत यांच्या बाजूने भरभरून मतदान केले. त्यामुळेच पहिल्या फेरीपासून आघाडी घेत अनपेक्षित अशा मताधिक्याने ते विजयी झाले.
या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये राऊत व राणे यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे – चिपळूण – राऊत ८५ हजार १३२, राणे ५३ हजार ९९२, रत्नागिरी ९४ हजार १३४ व ६२ हजार ५६९, राजापूर ७७ हजार ८८४ व ५५ हजार ५६९, कणकवली ७२ हजार ६४१ व ७१ हजार २६४, कुडाळ ७४ हजार १२३ व ५२ हजार २४०, सावंतवाडी ८८ हजार ९८८ व ४७ हजार ३६५.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा निवडणुकीतील राऊत यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मावळते खासदार नीलेश मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. पण पहिल्या फेरीत राऊत यांनी सुमारे सहा हजार मतांची आघाडी घेतल्याचे दिसून येताच ते तेथून निघून गेले. उद्योगमंत्री राणे दुपारी साडेबाराच्या सुमारास मतदान केंद्राबाहेर काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मंडपामध्ये आले. या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, निकालाचा कल पाहून मनस्वी खेद व्यक्त केला. खासदार नीलेश यांचा पराभव झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली आणि नंतर सुमारे तासाभराने मुख्यमंत्र्यांकडे तो पाठवूनही दिला.

गेली सुमारे पंचवीस वष्रे कोकणी जनतेसाठी एवढे काम करूनही असा पराभव पत्करावा लागला, ही नामुष्कीची बाब असून यापुढे सार्वजनिक विकासाच्या कामांमध्ये आपण पुढाकार घेणार नाही, असेही राणे यांनी उद्विग्नपणे नमूद केले.
या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांची मने मी ओळखतो. लोकांना येथे परिवर्तन हवे होते. वाडवडिलांची जहागिरी असल्याच्या थाटात राणे पिता-पुत्र वागत होते. प्रकल्पांच्या नावाखाली हैदोस घालत लोकांना उद्ध्वस्त करण्याचे काम करीत होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या लोकांना आधार देण्याचे काम शिवसेनेने केले. निवडणुकीनंतर या मतदारसंघात फिरताना आपल्याला मोठय़ा मताधिक्याचा अंदाज आला होता, असाही दावा राऊत यांनी केला.
आगामी काळात कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे नमूद करून या मतदारसंघात आपण खुनशीपणाचे राजकारण करणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

कोकणी जनतेचा विश्वासघात करू नका – उद्धव ठाकरे<br />या मतदारसंघातील या दणदणीत विजयामुळे कोकणातील महायुतीच्या गोटात आनंदाचे उधाण आले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी मतमोजणी केंद्राबाहेरच्या शिवसेनेच्या मंडपाजवळ येऊन कोकणी जनतेचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, येथील जनतेने महायुतीचे उमेदवार राऊत यांना एवढय़ा मताधिक्याने विजयी केले की माझ्याजवळ भावना व्यक्त करण्यास शब्द नाहीत. म्हणून मी या जनता-जनार्दनाच्या दर्शनासाठी येथे मुद्दाम आलो आहे. कोकणात यापुढे काम करताना, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, असे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना उद्धव यांनी केले. तसेच या जनतेचा विश्वासघात करू नका आणि या मतदारसंघावर फडकलेला भगवा खाली उतरू देऊ नका, असेही बजावले.

मतदारराजा कोपला
सर्वसामान्य मतदाराचा विचार न करता मनमानीपणाने कारभार करणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणे व त्यांचे चिरंजीव माजी खासदार नीलेश यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारराजाच्या उग्र कोपाचा झटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राजकीय साम्राज्य निर्माण केलेल्या राणे यांनी हम करे सो कायदा या पद्धतीने कारभार करताना दहशतही निर्माण केली. जैतापूर प्रकल्प, चिपीचा विमानतळ, सी-वर्ल्ड, एमआयडीसी इत्यादीसाठी शासकीय यंत्रणेचा बेछूट वापर केला. या प्रकल्पांसाठी अतिरिक्त जमीन संपादनाचा विषय येथील भूमिपुत्राच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ लागला. राणे यांचे दुसरे पुत्र, स्वाभिमानी संघटनेचे नेते नितेश यांचीही त्यामध्ये भर पडली. सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडीचे राजकारण त्यांना चांगलेच भोवले.

Story img Loader