उद्योगमंत्री नारायण राणे व त्यांचे खासदार पुत्र नीलेश यांच्या मनमानीपणाला कंटाळलेल्या सामान्य कोकणी जनतेने लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा दीड लाख मतांनी धुव्वा उडवत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना विजयी केले.
या अभूतपूर्व दणक्यामुळे उद्विग्न होऊन राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवून दिला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत ८ लाख ९३ हजार २६४ (६५.७१टक्के) विक्रमी मतदान नोंदवण्यात आले. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालेली होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत विनायक राऊत यांना ४ लाख ९३ हजार ८८, तर मावळते खासदार नीलेश यांना ३ लाख ४३ हजार ३७ मते पडली. त्यामुळे राऊत दीड लाख मतांच्या फरकाने निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणातील अन्य आठ उमेदवारांपैकी बसपाचे राजेंद्र अहिरे (१३ हजार ८८ मते) व आम आदमी पार्टीचे अभिजीत हेगशेटय़े (१२ हजार ७०० मते) वगळता अन्य उमेदवार पाच आकडी संख्याही गाठू शकले नाहीत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीपासून उपलब्ध झालेल्या नकाराधिकाराचा (नोटा) तब्बल १२ हजार ३९३ मतदारांनी वापर केल्याचे स्पष्ट झाले.
मागील लोकसभा निवडणुकीत (२००९) शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांचा ४६ हजार मतांनी पराभव करीत नीलेश राणे निवडून आले. त्या वेळी त्यांना या मतदारसंघातील चिपळूण,
रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या पाच विधानसभा मतदारसंघांमधून मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र सहाही मतदारसंघांनी महायुतीचे राऊत यांना घसघशीत आघाडी मिळवून दिली. या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघाने सर्वात जास्त, सुमारे ४१ हजार मतांची आघाडी मिळवून दिली. त्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राऊत यांनी सुमारे ३१ हजार मतांची आघाडी मिळवली. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या राजापूर मतदारसंघाने सुमारे २२ हजारांचे मताधिक्य दिले, तर सेनेचे दुसरे आमदार सदानंद चव्हाण यांच्या चिपळूण मतदारसंघातून सुमारे ३१ हजार मतांची आघाडी मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: राणे विजयी झालेल्या कुडाळ मतदारसंघानेही या निवडणुकीत राऊत यांना सुमारे २१ हजार मतांची आघाडी मिळवून दिली. तसेच गेल्या निवडणुकीत नीलेश यांना सुमारे २६ हजाराचे मताधिक्य देणाऱ्या कणकवलीनेही राऊतांच्याच बाजूने, नाममात्र का होईना, (१३७७ मते) कौल दिला. या पराभवाला राणे यांच्याविरोधात महायुतीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पदाधिकाऱ्यांचा उघड विरोध मुख्यत्वे कारणीभूत ठरला असला तरी एकूणच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, राज्यमंत्री सामंत व अन्य कार्यकर्त्यांची उदासीनताही जबाबदार असल्याचे मानले जाते. पण या सर्वापेक्षाही कोकणच्या या दोन्ही जिल्ह्य़ांमधील सर्वसामान्य कोकणी माणसाने राणे पिता-पुत्रांच्या मनमानीपणाला वैतागून राऊत यांच्या बाजूने भरभरून मतदान केले. त्यामुळेच पहिल्या फेरीपासून आघाडी घेत अनपेक्षित अशा मताधिक्याने ते विजयी झाले.
या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये राऊत व राणे यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे – चिपळूण – राऊत ८५ हजार १३२, राणे ५३ हजार ९९२, रत्नागिरी ९४ हजार १३४ व ६२ हजार ५६९, राजापूर ७७ हजार ८८४ व ५५ हजार ५६९, कणकवली ७२ हजार ६४१ व ७१ हजार २६४, कुडाळ ७४ हजार १२३ व ५२ हजार २४०, सावंतवाडी ८८ हजार ९८८ व ४७ हजार ३६५.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा निवडणुकीतील राऊत यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मावळते खासदार नीलेश मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. पण पहिल्या फेरीत राऊत यांनी सुमारे सहा हजार मतांची आघाडी घेतल्याचे दिसून येताच ते तेथून निघून गेले. उद्योगमंत्री राणे दुपारी साडेबाराच्या सुमारास मतदान केंद्राबाहेर काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मंडपामध्ये आले. या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, निकालाचा कल पाहून मनस्वी खेद व्यक्त केला. खासदार नीलेश यांचा पराभव झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली आणि नंतर सुमारे तासाभराने मुख्यमंत्र्यांकडे तो पाठवूनही दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा