जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीतील सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी बंद खोलीत चर्चा केल्याचा गौप्यस्फोट खासदार डॉ. नीलेश राणे यांनी गुरुवारी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीहून मुद्दाम येथे येऊन गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राणे म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांची जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बुधवारी राजापूरमध्ये बंद खोलीत चर्चा झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्याबाबत मी जास्त काही बोलू इच्छित नाही, पण पालकमंत्र्यांनी आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक आहे. मंत्री या नात्याने त्यांना आमदार राऊतांशी चर्चा करायची असेल तर ती उघडपणे व्हायला हवी होती. पण बंद खोलीत चर्चा झाल्यामुळे त्याबाबत शंका निर्माण झाली आहे. मी पालकमंत्र्यांना याबाबत काही विचारणार नाही. पण ९ मार्च रोजी काँग्रेस आघाडीची बैठक होणार आहे. तोपर्यंत त्यांच्याकडून खुलाशाची प्रतीक्षा आहे.
आपले हे वक्तव्य म्हणजे पालकमंत्र्यांना तंबी आहे, सूचना आहे की डोस आहे, असे पत्रकारांनी विचारले असता, तुम्हाला काय समजायचे ते समजा, असे उत्तर खासदारांनी दिले. मात्र सेनेचे उमेदवार राऊत यांना पराभवाची चाहूल आधीच लागल्यामुळे त्यांनी अशा तऱ्हेने बंद खोलीत चर्चा सुरू केल्या असाव्यात, असा टोमणा त्यांनी मारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा