सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात मोठी कारवाई केलीय. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता भाजपाच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. असं असतानाच आता माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत यांची ही संपत्ती आहे कशावरुन असा प्रश्न उपस्थित करत हा संजय राऊत यांनी कमवलेला काळा पैसा बाहेर आल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिलीय.
नक्की वाचा >> “२०१९ मध्ये राज्यात सरकार न बनवून शकलेली भाजपा…”; ED ने राऊतांवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.
संजय राऊतांवर झालेल्या कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया देताना निलेश राणेंनी, “संपत्ती जी काही ईडीकडून अटॅच करण्यात आलीय. ती संपत्ती आहे हे कशावरुन? हा काळा पैसा आहे असं मी समजतो. जे काय सापडलंय ते ईडीलाच माहिती. पण आज ना उद्या हे संजय राऊतांसोबत होणारचं होतं.
कारण इतका कोंबलेला पैसा हा कधी ना कधी बाहेर येणारच होता,” असं म्हटलंय.
“आता स्पष्टता देण्याचं काम राऊतांचं आहे. कुठून आला हा पैसा? फक्त सामानाचा पगार घेऊन? हे जे काही गाड्या फिरवतात, ज्या घरात राहतात हे सगळं त्या पगारातून आलंय का हे दाखवण्याची वेळ आलीय आता. आता राऊत काय बोलतात त्याला महत्व नाही. मनी लॉन्ड्रींग कायद्याअंतर्गत हा पैसा आला कुठून याचा पुरावा आता राऊतांना द्यावा लागेल,” असंही निलेश राणे म्हणालेत.
“संजय राऊत यांनी मागच्या वेळेला आयकरमधून पैसे चोरलेले. अशी ढापाढापी करत असतात ते. काळ्या पैशाची जमावजमव करत असतात. या काळ्या पैशाची जमवाजमव करता करता. ते आज इथपर्यंत आले आणि ईडीने त्यांना पकडलं. आज ना उद्या हे होणारच होतं,” असा खोचक टोला निलेश यांनी लगावला आहे.
“ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत जे तडफडतायत किंवा जे काही बोलत असतील ते मी ऐकलेलं नाही. पण झालं ते योग्य झालं. हे होणारच होतं. संजय राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही (कारवाई) होऊ शकते. त्यांनाही काळापैसा जमा केला असेल. आज ना उद्या बाहेर पडणार ते सगळं,” असंही निलेश राणेंनी म्हटलंय.
आकसापोटी केलेली कारवाई आहे असं राऊत म्हणत असल्याचं संदर्भ देत पत्रकाराने प्रश्न विचारला असता निलेश राणेंनी, “ही त्यांची फार जुनी टेप आहे. ते स्वत:ला फार महत्व देतात. आम्ही त्यांना एवढं महत्व कधीच दिलेलं नाही. जर काळापैसा कोणी जमवला असेल. मनी लॉन्ड्रींगअंतर्गत तपास यंत्रणेला काही धागेदोरे मिळाले असतील तर त्याआधारे ते तिथपर्यंत पोहचले,” असं म्हटलंय.