संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. मात्र या प्रकरणावरुन श्रीमंत शाहू महाराज आणि संभाजीराजे यांच्या वक्तव्यांमधील विरोधाभास दिसून येत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार तसेच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विटरवरुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राजघराण्यातील सदस्यांना सल्ला दिलाय.

नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्यासाठी विषय संपला…
संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली असली तरी आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. ही उमेदवारी देण्यासाठी आम्ही संभाजीराजेंकडे आमची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडलेली होती. त्यामुळे फसवण्याचा प्रश्नच नसल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. संभाजीराजे यांच्या चुकलेल्या उमेदवारीला दुर्दैवी म्हणणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका करताना राऊत म्हणाले, की त्यांना असे वाटत असेल तर काँग्रेसने संभाजीराजेंना उमेदवारी देत निवडून आणावे, अशा टोलाही राऊत यांनी लागवला.

राऊत पत्रकारपरिषदेत काय म्हणाले…
संभाजीराजे छत्रपती यांनी काल पत्रकार परिषद घेत आपल्या माघारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत त्यांनी शब्द पाळला नसल्याची टीका केली आहे. त्यांच्या या उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राऊत रविवारी कोल्हापूर दौरा केला. या वेळी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणावर त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आम्ही संभाजीराजे यांची उमेदवारी रद्द केली नाही तर त्यांना आमची भूमिका न पटल्याने ही उमेदवारी बाजूला पडली आहे असे सांगत राऊत म्हणाले की, ही उमेदवारी देण्यापूर्वी पक्षाने त्यांना काही गोष्टींची स्पष्ट कल्पना दिलेली होती. हा विषय महाविकास आघाडी, शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील आहे. यावरून त्यांची कुणी फसवणूक करण्याचा प्रश्नच नाही. राजे महाराजे यांना राजकारणात करियर करायचं असेल तर त्यांनाही कोणत्या तरी एका पक्षाबरोबर निष्ठेने राहावे लागते, असा टोलाही त्यांनी संभाजीराजे यांचे नाव न घेता लगावला.

नक्की वाचा >> आव्हाडांनी केली शाहू महाराज आणि शरद पवारांची तुलना; ‘बहुजनवाद विरुद्ध मनूवाद’ मथळ्याखालील पोस्टमध्ये म्हणाले, “सनातनी आणि…”

भाजपाला दिला सल्ला…
दरम्यान, या रद्द झालेल्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीवर छत्रपती घराण्याचा अपमान केल्याची टीका करणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरही राऊत यांनी या वेळी टीका केली. यावरून महाविकास आघाडी आणि छत्रपती घराणे, मराठा समाज अशी दरी निर्माण केली जात असल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, हा शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील विषय आहे. त्यांना उमेदवारी का दिली नाही याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. मात्र यातून सुरू झालेल्या विविध मतमतांतरांचा फायदा घेत भाजपाने राजकारण करू नये, असा सल्ला राऊत यांनी दिला.

नक्की वाचा >> “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता…”; सोमय्यांचा हसरा फोटो शेअर करत NCP च्या मिटकरींचा टोला

निलेश राणेंचा टोला…
निलेश राणेंनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच ट्विटरवरुन निशाणा साधला. या ट्विटमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करतानाच छत्रपतींच्या घराण्याला एकमत दाखवण्याचा सल्ला निलेश राणेंनी दिलाय. “किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संजय राऊतांसारख्या फडतूस माणसाला बोलण्याची संधी देऊ नये. तुम्हीच एकमत दाखवलं नाही तर समाज तुमच्याकडून काय बोध घेईल? परत परत बोलून लाथ मारलेल्या खासदारकीला आपण महत्त्व देताय,” असं निलेश राणेंनी म्हटलंय.

संभाजीराजेंचे निर्णय व्यक्तिगत; श्रीमंत शाहू महाराजांचे स्पष्टीकरण
संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते अशाप्रकारे चुकीचा संबंध जोडत असतील तर ते चुकीचे असल्याचा निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी येथे बोलताना दिला. तसेच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही मुद्दय़ावर राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठरले होते. यातूनच ही उमेदवारी काही कारणांनी ते देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केले.

सत्यच बोललो – संभाजीराजेंचा पवित्रा
राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून श्रीमंत शाहू महाराज यांचे विधान चर्चेत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवताना ‘ मी सत्यच बोललो आहे’  असे म्हणत आपले विधान खरे असल्याचा दावा केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप केला होता. त्यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. या वर संभाजीराजे यांनी  ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane slams sanjay raut says royal family should have unity scsg