शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांचे नेते आणि राज्याचे विद्यामन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी लगावल्यानंतर आता यावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी केलेल्या या टीकेला राणेंनी ट्विटरवरुन उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राऊत नेमकं काय बोलले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकलं आहे असं ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं होतं. याचसंदर्भात बोलताना, “एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल,” असा टोला विनायक राऊत यांनी लगावला होता.

निलेश राणेंनी दिलं उत्तर..
याच टीकेवरुन निलेश राणेंनी ट्विटरवरुन एकेरी उल्लेख करत विनायक राऊतांना उत्तर दिलंय. या ट्विटमध्ये निलेश यांनी विनायक राऊत यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन टीका केलीय. “खासदार विनायक राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते सांगतोय. हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो,” असं म्हणत निलेश राणेंनी संताप व्यक्त केलाय.

विनायक राऊत यांनी मुलाखतीमध्ये आपल्यामुळेच एकनाथ शिंदेंना उमदेवारी मिळाल्याचाही दावा केलाय. “मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं.” असं आव्हान विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane slams shivsena leader vinayak raut as he takes dig at maharashtra cm eknath shinde scsg