महाविकास आघाडी सरकार आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपाचे नेते मविआ सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मविआ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने निलेश राणे यांनी टीका केली आहे. मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. २८ एप्रिल २०२२ रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ निर्णय आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे.

“काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय.” असं पोस्ट त्यांनी फोटो ट्वीट करत केली आहे.

नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांशी संबंध असलेल्या मालमत्तेच्या व्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिकला फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात असून त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही.