मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली. नारायण राणे यांच्याविरोधात सर्वात प्रथम नाशिक आणि नंतर महाड, ठाणे, पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान जन आशीर्वाद यात्रेत असणाऱ्या नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. दरम्यान नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक झाली आहे. दरम्यान राणेंना अटक करुन पोलीस त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्थानकात नेत असताना त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी गाडी आडवण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा >> “नारायण राणेंच्या जीवाला धोका, कोर्टात सादर न करता अटक करुन रात्री…”; भाजपाने व्यक्त केली भीती
दुपारी सव्वा तीनच्या सुमारास नारायण राणे यांना गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. ३ वाजता नारायण राणे रत्नागिरीत पोहोचणं अपेक्षित होतं मात्र पोलिसांनी त्यांना अडवून ठेवलं. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सव्वा तीनच्या सुमारास दाखल झाले आणि पोलिसांनी राणे यांना अटक केली. नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस राणेंना त्यांच्या गडीमध्ये बसवून नेत असतानाच राणेंचे पुत्र निलेश राणे हे गाडीच्या एका बाजूने आडवे येत गाडी पुढे जाण्यापासून अडवत होते. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाजूला करत राणेंच्या गडीसमोरील मार्ग मोकळा केला.
त्यानंतर नारायण राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यावेळीही पोलिसांनी नारायण राणेंना हात लावू नये असं निलेश राणे सांगताना व्हिडीओत दिसलं. नारायण राणे जेवत असतानाच पोलीस अटक करायला आल्याने निलेश राणे चांगलेच संतापले.
नारायण राणे जेवण करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं, निलेश राणे संतापले…https://t.co/2jrmCKNbWi #Maharashtra #Ratnagiri #NarayanRane #Police @MeNarayanRane @meNeeleshNRane pic.twitter.com/DkfpmSghjC
— LoksattaLive (@LoksattaLive) August 24, 2021
राणे यांना अटक केल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे आणि प्रसाद लाड यांची पोलिसांसोबत पोलीस स्थानकामध्येच बाचाबाची झाली. कुठल्या गुन्ह्याखाली अटक केलीय हे जाणून घेण्याचा हक्क आहे की नाही, असा प्रश्न निलेश राणे यांनी पोलिसांना विचारला.