मुखमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री या सभेमध्ये काय बोलणार? यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या सभेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं किंवा ओवेसींनी ओरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणं या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे. त्यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
राज्यात सध्या विधानपरिषद आणि राज्यसभा या दोन्ही निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. २४ वर्षांनंतर राज्यात राज्यसभा निवडणूक होत असल्यामुळे त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्याशिवाय, विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. याशिवाय राज्यात इतर अनेक राजकीय वादाच्या मुद्द्यांवर आज मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
“…कुठला आमदार पळून तर गेला नाही ना?”
निलेश राणेंनी यासंदर्भात ट्वीट करताना औरंगाबाद सभेचा उल्लेख केला आहे. “आज शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा संभाजीनगरमध्ये आहेत. पण पूर्ण लक्ष राहणार मुंबईत की कुठला आमदार पळून तर गेला नाही ना”, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.