विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. नारायण राणे यांचे सुपूत्र आणि काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी शनिवारी गुहागर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. गुहागर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे आणि जाधव यांच्यातील वाद शिगेला पोहचण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकीत आपण भास्कर जाधव यांची पैशाची मस्ती उतरवून दाखवू, असे निलेश राणे यांनी म्हटले.
गुहागर मतदारसंघातून लढण्याचा निर्णय आपण स्वतंत्रपणे घेतला असून, नारायण राणे यांना या निर्णयाबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नसल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. कोणत्याही परिस्थितीत निर्णय बदलणार नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाकडून कारवाई झाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाच्या भास्कर जाधव यांनी आघाडीचा धर्म न पाळता आपल्या प्रचारात काडीचीही मदत केली नसल्याने, त्यांच्याविरोधातच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे निलेश राणेंनी सांगितले. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत कलह रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
निलेश राणे गुहागरमधून भास्कर जाधवांविरोधात निवडणूक लढवणार
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. नारायण राणे यांचे सुपूत्र आणि काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी शनिवारी गुहागर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
First published on: 16-08-2014 at 06:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane will contest election from guhagar