माहूर येथे घडलेले निलोफर-शाहरुख या प्रेमीयुगलाचे हत्याकांड हा ‘ऑनर किलिंग’ चा प्रकार असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. निलोफर आणि शाहरुख या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सुपारी देऊन खून केल्याच्या आरोपाखाली नांदेड पोलिसांनी सुरुवातीला सहा जणांना अटक केल्यांवर आता आणखी पाच जणांना अटक केल्यामुळे आता अटक झालेल्या आरोपींची संख्या ११ झाली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये निलोफरच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.
माहूरच्या रामगढ किल्ल्यात २२ वर्षीय निलोफर बेग या पुसद येथील युवतीसह तिचा प्रियकर शाहरुख फिरोज पठाण (२३) यांचे मृतदेह १० सप्टेंबरला सापडले होते. राज्यात या प्रकरणाने खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्यांकाडामुळे माहूर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते.
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अण्णा डोईफोडे यांच्या चमूने सुरुवातीला पाच जणांना अटक केली. त्यात राजा रघुनाथ गाडेकर (२०), पेंटर शेख हुसेन (३८), रंगराव शामराव बाबटकर (२५), िपटू शामराव बाबटकर (१९) यांचा समावेश होता. नंतर फरार आरोपी रघू रोकडा उर्फ रघू डॉन याला माहूर पोलिसांनी पकडले.
अधिक तपासानंतर पुसद येथील सय्यद अथर अली, माहूर येथील खैसर मिर्झा बहादूर मिर्झा, फुलसावंगी (ता. महागाव) येथील मिर्झा खालील बेग मिर्झा कमर बेग, चिकार अहमद नवाब अहमद, नवाबजानी कमर बेग या पाच जणांना अटक करून त्यांची गुरुवारी माहूर न्यायालयातून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळविली.
आपल्या ‘खानदान’च्या पासंगातही शाहरुखचे कुटुंब बसत नाही म्हणून आपली मुलगी निलोफरसह तिचा प्रियकर शाहरुखचा दोघांचाही सुपारी देऊन निर्घृण खून करण्यात आला.
निलोफर आणि शाहरुख यांच्या प्रेमप्रकरणापूर्वी निलोफरने एकदा शाहरुखविरुद्ध तक्रार केली होती, पण नंतर तिच्याशी सूत जुळवण्यात शाहरुख यशस्वी झाला. निलोफरच्या कुटुंबीयांना या दोघांचे प्रेम प्रकरण मान्य नव्हते. अखेर नियोजनबद्ध रितीने दोघांचाही निर्घृण खून करण्यात आला. ही घटना ऑनर किलिंगचीच असल्याचे खळबळ निर्माण झाली आहे.