तालुक्याच्या पश्चिम भागात श्रावणसरींचा जोर अद्यापही टिकून आहे, त्यामुळे या डोंगररांगात उगम पावणाऱ्या मुळा, प्रवरा, आढळा, कृष्णवंती आदी लहानमोठय़ा नद्या दुथडी भरुन वाहत असून धरणांच्या पाणीसाठय़ात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे निळवंडे व मुळा ही धरणे निम्मी भरली असून भंडारदऱ्याचा पाणीसाठा ७० टक्के झाला आहे. आढळा धरणही ३० टक्के भरले आहे.
जुलैच्या मध्यापासून तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे सातत्य टिकून आहे. आषाढ सरींसारखी सततधार नसली तरी श्रावणसरीही जोरदारपणे कोसळत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नऊ लघुपाटबंधारे तलाव ओसंडून वाहत आहेत. भंडारदरा धरणात सायंकाळी ७ हजार ७१७ दशलक्ष घनफूट होता. धरणातून वीजनिर्मितीसाठी ८४९ क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून कृष्णवंतीही दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे निळवंडे धरणात चांगलीच वाढ झाली. निळवंडेत यंदा ६ हजार ५२० दशलक्ष घनफूट साठा करण्यात येणार आहे. आज सायंकाळी साठा ३ हजार २६६ दशलक्ष घनफूट होता.
जिल्ह्यातील सर्वात मोठे, मुळा धरण आज निम्मे भरले. सायंकाळी साठा १३ हजार २७४ दशलक्ष घनफूट होता. मुळा नदी अजुनही दुथडी भरुनच वाहत असून सायंकाळी कोतूळजवळ विसर्ग ६ हजार ५९२ क्युसेक होता. तीन दिवसातच आढळा धरणाचा साठा तीस टक्क्यांपर्यंत, ३१९ दशलक्ष घनफूट पाणी होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा