जिल्ह्य़ातील तेरखेडा येथे मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊवर गेला आहे. बुधवारी सकाळी छताच्या मलब्याखाली आणखी एक मृतदेह सापडला. दरम्यान, हा स्फोट वीज कोसळल्यामुळे झाला की हलगर्जीपणामुळे नऊजणांचा जीव गेला, याची चौकशी होणे गरजेचे ठरले आहे. कारखान्यातील बाहेरील बाजूस वीज कोसळल्याच्या कसल्याही खुणा आढळून येत नसल्यामुळे घडलेल्या दुर्घटनेला प्रशासनाचे दुर्लक्ष व फटाका उद्योजकांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
मंगळवारी दोन कारखान्यात स्फोट झाला. यात नऊजण ठार, तर अन्य सहाजण गंभीर जखमी झाले. अनेक निकष पायदळी तुडवून कारखान्याला परवानगी दिली असल्याचे उघड झाले आहे. ज्या प्रिन्स फायर वर्क्स कारखान्यात स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला, त्या कारखान्याच्या छतावरून ३३ केव्हीची वीजवाहिनी गेली आहे. मंगळवारी झालेल्या स्फोटात या तारा तुटून इमारतीवर पडल्या. त्यामुळे धोकादायक तारा इमारतींवर असताना प्रशासनाने फटाका निर्मितीचा परवाना दिलाच कसा, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
वेलकम कारखान्यात वीज कोसळून स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात कारखान्याच्या बाहेर वीज कोसळल्याच्या कसल्याही खाणाखुणा दिसत नाहीत. सगळी आग कारखान्याच्या आतील बाजूस लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. लाकडी दरवाजेही बाहेरच्या बाजूने शाबूत आहेत. त्यामुळे तेरखेडय़ातील दुर्घटनेस प्रशासनाची उदासीनता व फटाका उद्योजकांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे की वीज कोसळली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, प्रिन्स फायर वर्क्स या कारखान्यात मंगळवारी झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महादेव ज्ञानोबा सरवदे यांचा मृतदेह बुधवारी शोधकार्यावेळी आढळून आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा