पाणीटंचाईचा फटका गुराढोरांप्रमाणेच पक्ष्यांनाही बसू लागला असून, कळवण तालुक्यात दोन आठवडय़ांत नऊ मोरांचा मृत्यू झाला आहे. कळवणच्या पूर्व भागातील निवाणेपासून चार किलोमीटर अंतरावर दह्याने बारी वस्ती आहे. येथील डोंगर उतारावर सोमवारी सकाळी झुडपांमध्ये दोन मोर मृत्युमुखी पडल्याचे स्थानिक लहान मुलांना आढळून आले. शेजारीच असलेल्या झाडांच्या जाळीत अडकलेल्या एका मोरास बाहेर काढल्यावर त्याला उभे राहाता येत नसल्याचे मुलांना दिसून आले. या मोराला पाणी पाजल्यावर त्याला उभे राहाता आले. दोन मोरांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवूनही दुपापर्यंत घटनास्थळी एकही वन कर्मचारी फिरकलेला नव्हता. मागील आठवडय़ात याच डोंगरावर सात मोर मृतावस्थेत आढळून आले होते. या डोंगररांग परिसरात निवाने बारी, दह्याने बारी, पाडवा बारी, गोडीन दरा यसुदरा, तेलदय, गावदरा, मोंडय़ा, पेढेडोंगर असे सुमारे एक ते दीड हजार एकर जंगल क्षेत्र आहे. या परिसरातील माकडांनी याआधीच पाण्याअभावी निवाने गावाच्या दिशेने स्थलांतर केले आहे. परंतु अजूनही या जंगलात काही हजारांवर मोर असून पाण्याअभावी तेही संकटात आहेत. परिसरात कळपाने फिरणारे मोर कधी कधी शेतातील वस्तीजवळ येतात. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे अस्तित्व संकटात सापडले असताना वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. संबंधित वनाधिकाऱ्यांनी मोरांसाठी जंगलात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी पर्यावरण व पक्षीप्रेमींनी केली आहे.

Story img Loader