संगमनेर : संगमनेर मध्ये बनावट नोटा छापल्या जात असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासात एकेक आश्चर्यकारक बाब समोर येत आहे. बनावट नोटा छापण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, रेवेन्यू इंटेलिजन्सने देशभरात एकाच वेळी अकरा ठिकाणी छापे टाकले. त्यात महाराष्ट्रातील संगमनेर व कोल्हापूर या ठिकाणांचा समावेश आहे. संगमनेरातील एका व्यक्तीसह एकूण नऊ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली
केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सला मिळालेल्या गुप्त माहितीतून त्यांनी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारीची कारवाई केली. देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात बहुतांश ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने नऊ जणांना अटक करण्यात आले आहे. महाराष्ट्रामधील संगमनेर, कोल्हापूरमध्ये तर हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. देशभरात टाकलेल्या ११ छापांमध्ये सात ठिकाणी बनावट चलनी नोटा छपाई सुरू असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास करत असताना बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी संगमनेरमध्ये गुंजाळवाडी गावातील एका कर्मचाऱ्याला तर कोल्हापूरमध्ये दोघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून काही बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याची साधने जप्त करण्यात आले आहे.
संगमनेरमधील गुंजाळवाडीत पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत रजनीकांत राजेंद्र राहणे याला पकडण्यात आले. विशेष बाब म्हणजे राहणे हा गुंजाळवाडी ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे. राहणे याने हाय सेक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर करुन एचपी कंपनीच्या प्रिंटरचा वापर करत भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघडकीस आले. छाप्यादरम्यान तेथे एका प्लास्टिक पिशवीमध्ये A-4 साईजचे शंभर पेपर आढळून आले.
परदेशातून कुरियरने आला नोटाछपाईचा कागद
बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणावर हाय सिक्युरिटी आरबीआय ट्रेड पेपर (खोट्या नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा) भारत सरकारची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान करत डीटीडीसी या कुरिअर कंपनीमार्फत देशभरात पाठवण्यात आल्याची तसेच अलिबाबा या वेबसाईटवरून हा पेपर संबंधितांनी मागविल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणांमध्ये मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथे डीआरआयने सिक्युरिटी पेपर आयातदाराची ओळख पटवून त्याचा शोध घेतला आहे. कारवाईदरम्यान पन्नास शंभर आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, लॅपटॉप, प्रिंटर, पेन ड्राईव्ह, सिक्युरिटी पेपर, महात्मा गांधींचे वॉटर मार्क असलेले बटर पेपर आदी यंत्रसामुग्री जप्त केली. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.