पीएनबी बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीचा अलिबागमध्ये असलेला बंगला जमीनदोस्त केला जाणार आहे. नियंत्रीत स्फोटाने हा बंगला जमीनदोस्त केला जाणार आहे. बुधवारी ही कारवाई केली जाणार आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातली कारवाई केली आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला अनधिकृत ठरवला होता.
नीरव मोदीचा बंगला पाडण्याची तयारी
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्यासह सिनेजगतातील तारे तारका, उद्योगपती, वरिष्ठ वकील यांनी अलिबाग किनाऱ्यालगतच्या परिसरात पर्यावरण कायदा बसवून खासगी बंगले उभे केले गेले आहेत. १८ वर्षांपूर्वी या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कारवाई झाली नाही. त्यानंतर नीरव मोदीचे प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हाही हा बंगला पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र दगडी बांधकाम असल्याने हा बंगला पाडता आला नव्हता. त्याचमुळे सुरुंग लावून हा बंगला पाडला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.
नीरव मोदीचा बंगला अनधिकृत
नीरव मोदी याला ३९० चौरस मीटरवर बंगला बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याने अतिरिक्त ६१० चौरस मीटर परिसर बळकावून एकूण एक हजार चौरस मीटर जागेवर बंगला बांधण्यात आल्याचे उघड झाले. हाच बंगला आता सुरुंग लावून पाडण्यात येणार आहे.