Sushma Andhare on Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदच्या आंदोलनात महाविकास आघाडी आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यात खटके उडाल्यानंतर आज शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना विकृती दाखवली गेली. इतिहासात ज्यांनी नौसेना स्थापन केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीतच एवढी हलगर्जी का केली गेली? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी देणे गरजेचे आहे. शिवरायांचा अवमान केला गेला, असाही आरोप त्यांनी भाजपावर केला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर आणि मालवण दोन्ही ठिकाणी आपटे जबाबदार

सुषमा अंधारे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि मालवण पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात दोन्ही ठिकाणी आपटे नावाच्या व्यक्ती जबाबदार असल्याकडे लक्ष वेधले. दोन्ही आरोपी आपटेंना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला. जर फडणवीस आपटेंना वाचवत असतील तर महायुतीच्या सरकारला कसे आपटायचे, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगले माहीत आहे, असेही त्या म्हणाल्या.

हे वाचा >> छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात शिल्पकार जयदीप आपटेने कापूस आणि कापड..”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

आपटे आणि नितेश राणे यांचे संबंध

“जयदीप आपटे हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे, हे त्याच्या मुलाखतीवरून स्पष्ट झाले आहे. जो माणूस दीड फुटापेक्षा जास्त उंचीचे पुतळे उभारू शकत नाही, अशा माणसाला एवढे मोठे काम का दिले गेले?”, असा प्रश्न शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी भाजपाचे आमदार नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे एकत्रित फोटो दाखवून या दोघांचा संबंध काय? असाही प्रश्न विचारला.

नितेश राणे आणि जयदीप आपटे यांची मैत्री असल्यामुळेच सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये पुतळा उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली का? ये रिश्ता क्या केहलाता है? असेही सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. मालवणमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी केला आहे. नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे संबंध असल्यामुळेच अनुभव नसलेल्या व्यक्तीला काम दिले गेले, असा आरोप अंधारे यांनी केला.

आणखी वाचा >> Rohit Pawar: मालवणमधील पुतळा उभारण्यासाठी किती कोटी खर्च झाले? रोहित पवारांनी कार्यक्रमाच्या खर्चाची दिली माहिती

आपटेला आम्ही आपटणारच – नितेश राणे

सुषमा अंधारे यांच्या आरोपांना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. “जयदीप आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच, यात शंका नाही. त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, तो कुणीही असो, त्याचा फोटो कुणाबरोबरही असो पोलिस संरक्षणाच्या बाहेर तो चुकून आम्हाला सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असे उत्तर नितेश राणे यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane and sculptor jaydeep apte are friends allegation made by shiv sena ubt leader sushma andhare kvg