काही वर्षांपूर्वी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्यातील महत्वाच्या नेत्याचं फोन टॅपिंग केल्याचं समोर आलं होतं. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी न्यायालयात सुनावणीही सुरु आहे. अशात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याचा सल्ला दिला आहे. फोन टॅपिंगच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हा सल्ला दिल्याची सांगितलं जात आहे. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना नितेश राणे म्हणाले की, ” उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आयफोन वापरण्याच्या लायकीचं ठेवलं आहे का? कधी वडापावच्या पेक्षा जास्त दिलं आहे का? स्वत: बिर्याणी आणि लाल मांस शिवाय खात नाही. कोणत्याही रेस्टाँरंटमध्ये गेल्यावर बिल न देता बाहेर येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना कोणत्या तोंड्यानं आयफोन वापरण्यास सांगत आहात.”

हेही वाचा : “राणेंचा चेहरा पाहिला तरी महाराष्ट्रायीन सोडा…”, नितीन देशमुखांची खोचक टीका

“दुबई आणि साऊथ आफ्रिकेत हॉटेलं…”

“तुमचं खरेच कार्यकर्त्यांवर प्रेम आहे, तर त्यांना आयफोन घेऊन द्या. चोरी-चपाटी करत, भ्रष्टाचाराने पैसा कमवून ठेवला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एवढी संपत्ती जमवून ठेवली आहे की, नंदकिशोर चतुर्वेदी भेटतच नाही. दुबई आणि साऊथ आफ्रिकेत हॉटेल असून, तो पैसा कोणत्या कामाचा आहे,” असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

“राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओ आणि ऑडिओ…”

दरम्यान, आयफोन वापरण्याच्या प्रकरणी बोलताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “अशा कोणत्याही सूचना करण्यात आल्या नाही. पण, सध्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओ आणि ऑडिओ क्लीप व्हायरलं होतात. त्यामुळे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी आयफोन वापरावा. अशा सूचना जिल्ह्यात दिल्या आहेत.”

हेही वाचा :“कोणत्याही परिस्थितीत मला अटक होणार”, जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यावरून अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं; म्हणाले…

“हे सरकार छोट्या-छोट्या शिवसैनिकांना…”

“तत्कालीन सरकारने रश्मी शुक्लाला फोन टॅपिंग करण्यास सांगितलं होतं. सरकारचं जाणीपूर्वक सर्व हालचालींवर लक्ष असतं. आताचं सरकार कोणत्याही स्तराला जावू शकते. हे सरकार छोट्या-छोट्या शिवसैनिकांना त्रास देत आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार गैरफायदा घेऊ शकतं. म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना देत असतो,” असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलं.