कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल खासदार संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला. तसेच त्यांनी भाजपावर जोरदार टीकाही केली. दरम्यान, संजय राऊतांच्या या बेळगाव दौऱ्यावर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी टीकास्र सोडलं आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले नितेश राणे?
“छगन भुजबळ, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बेळगावसाठी आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. मात्र, या आंदोलनावेळी संजय राऊत नेमके कुठं होते, याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि मगच बेळगाववर बोलावं”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“बाळासाहेबांनी बेळगावसाठी आंदोलन सुरू केलं. तेव्हा संजय राऊत शिवसेनेत सुद्धा नव्हते. त्यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. काल संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन तेथील मराठी माणसांविषयी मोठमोठ्या गोष्टी केल्या. मात्र, संजय राऊतांनी पत्राचाळमधील मराठी माणसांविषयी बोलावं. खरं तर संजय राऊतांना बेळगाव आणि हिंदुत्त्वाबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही”, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना राष्ट्रवादीतील घडामोडींवरून त्यांनी संजय राऊतांवर टीकास्र सोडलं. “संजय राऊतांचं पूर्ण राजकारण हे चोंबडेगिरीवर चालतं. दुसऱ्याच्या घरात आग लावणं, एवढच संजय राऊतांचं काम आहे. त्यांनी चोंबडेगिरी करण्यात पीएचडी केली आहे. संजय राऊतांनी आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडणं लावली. आता सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये भांडणं लावण्यात काम ते करत आहेत. अजित पवारांना राऊतांचा रंग माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी राऊतांना खडसावलं होतं. राऊतांचा एक डोळा पवार कुटुंबियांवर तर दुसरा डोळा तेजस आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आहे”, असा आरोप त्यांनी केला.