रविवारी मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपावर सडकून टीका केली होती. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावरून त्यांनी राहुल गांधी यांनाही सुनावलं. दरम्यान, या सभेपूर्वी मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचे उर्दू भाषेतील पोस्टर बघायला मिळाले होते. यावरून भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “…मग आता तुम्हाला बायको, मुलगी आठवली नाही का?”, शीतल म्हात्रेंचं जितेंद्र आव्हाडांवर टीकास्र!
काय म्हणाले नितेश राणे?
मालेगावातील उर्दू भाषेतील बॅनरवरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे. त्यांचं धर्मांतर झालं आहे. त्यामुळे त्यांना आता हिंदू धर्माबद्दल आस्था नाही. ज्या माणसाने मुळात मुस्लीम धर्म स्वीकारला, तो आता हिंदूबद्दल चांगलं काय बोलणार? आणि काय लिहिणार? त्यामुळे उर्दू भाषेत बॅनर लावण्यात आले, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंना लक्ष केलं. मुख्यमंत्री असताना त्यांना सावरकर दिसले नाही. तेव्हा त्यांना खुर्ची प्रिय होती. तेव्हाही राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला होता. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांना काही बोलावसं वाटलं नाही. आज खुर्ची गेल्यानंतर सावरकरांसाठी आम्ही काही तरी करतोय, हे दाखवण्यासाठीच हा प्रकार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मालेगावात लागले होते उर्दू भाषेतील बॅनर
रविवारी नाशिकच्या मालेगावातील एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यासभेपूर्वी मालेगावात उर्दू भाषेतील बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर “अब हमे जितने तक लढना हैं : अली जनाब उद्धव साहब ठाकरे”, असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर शिंदे गट -भाजपाने ठाकरे गटावर सडकून टीका केली होती.