उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच कारणामुळे ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. आज (१८ ऑक्टोबर) नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा तसेच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. मात्र भास्कर जाधव यांच्या याच टीकेचा समाचार आमदार नितेश राणे यांनी घेतला आहे. भास्कर जाधव हे खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का? हा संशोधनाचा विषय आहे, असे नितेश राणे म्हणाले आहेत. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा>>>> “अहो नारायण राणे, तुम्ही ३९ वर्ष…”, राणे पिता-पुत्रांची नक्कल करत भास्कर जाधवांचा खोचक टोला!

“भास्कर जाधव म्हणतात मी शिक्षकाचा मुलगा आहे. मात्र मला तसे वाटत नाही. शिक्षकाचा मुलगा एवढा वात्रट निघेल, असे मला वाटत नाही. शिक्षक असलेल्या वडिलांनी त्यांच्यावर काय संस्कार केले असतील? भास्कर जाधव हे खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे,” अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा>>>> नितेश राणेंचे वैभव नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! थेट कागदपत्रेच केली सादर

नितेश राणे यांनी नाईक यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चालाही लक्ष्य केले. “वैभव नाईक यांनी भ्रष्टाचार करायचा, बेहिशोबी मालमत्ता जमा करयाची. तर दुसऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढायचा, असे सुरू आहे. ते सगळे एकत्र येत आमच्यावर टीका करतात. यापेक्षा वैभव नाईक यांनी एसीबीला उत्तर द्यायला हवे. कुडाळ-मालवणच्या, सिंधुदुर्गच्या जनतेला मी निर्दोष आहे, हे सांगण्याची जबाबदारी नाईक यांची होती,” असेही नितेश राणे म्हणाले.

भास्कर जाधव काय म्हणाले होते?

नारायण राणेंवरील आरोपांचा संदर्भ देत भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना झाल्याचं भास्कर जाधव म्हणाले. “या तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले. त्यांनी रे रोडला एक प्रकल्प उभा केला. त्यात ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी, म्हणून किरीट सोमय्यांनी तेव्हा आरोप केले होते. आज मंत्रीमंडळात बसलेले ५० टक्के लोक, मंत्रीमंडळाबाहेर आमदार असणाऱ्या लोकांवर भाजपाकडून असेच आरोप केले जात होते. पण तेच लोक भाजपात गेले आणि एकदम साफ, स्वच्छ झाले. भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी नारायण राणेंची नक्कल केली. “नारायण राणेंचं एकच कीर्तन असतं. ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेनं काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असा सवाल भास्कर जाधवांनी नारायण राणेंना केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane criticizes bhaskar jadhav for commenting on narayan rane prd