महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईत पार पडली. मुंबईतल्या वांद्रे – कुर्ला संकुलातील नरे पार्क मैदानात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाषणं केली. अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केंद्रातल्या मोदी सरकारपासून ते राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारपर्यंत सगळ्यांना धारेवर धरलं. अजित पवारांनी नाव न घेता नितेश राणेंनाही टोला लगावला.
अजित पवार म्हणाले, आपल्याबद्दल (महाविकास आघाडी) वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. राज्यात आलिकडच्या काळात वाचाळविरांची संख्या वाढली आहे. टिल्ली टिल्ली लोकं सुद्धा काहीपण बोलायला लागली आहेत. आपण काय बोलतोय काय नाही… यांचे अनेक शब्द मीडियाला दाखवताही येत नाही. अशा प्रकारचा सत्ताधारी पक्षाचा कारभार चालला आहे.
दरम्यान, यावेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राणे कुटुंबावर टीका केली होती. आपल्यावरील या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. राणे यावेळी म्हणाले, “काल उद्धव ठाकरे आणि अजित दादांनी माझ्या पत्रकार परिषदांचा उल्लेख केला. तसं म्हटलं तर अजित दादांना सगळंच माफ आहे. ते करमुक्त आहेत. म्हणून त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. पण उद्धवजींना मी सांगेन तुमच्यावर बोललं तर तुम्हाला झोंबतं, पण तुमच्या सकाळच्या भोंग्याचं काय?”
हे ही वाचा >> VIDEO : “अरे पचास खोका तुमने खाया…”, जितेंद्र आव्हाडांचं रॅप साँग ऐकलं का?
नितेश राणे म्हणाले, उद्ववजी, तुमच्यावर कोणी काही बोललं तर तुम्हाला झोंबतं. तुम्ही मग लोकांना तीनपाट म्हणता. मग तुमच्या सकाळच्या भोंग्याचं काय? हा माणूस (संजय राऊत) काही वर्षांपासून रोज सकाळी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करतो ते तुम्हाला इतक्या वर्षात दिसलं नाही का? ही माझी केवळ पाचवीच पत्रकार परिषद आहे.