सिंधुनगरीत सुरू असलेले डंपर व्यावसायिकांचे आंदोलन सकाळी मागे घेत असल्याचे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले. दरम्यान पोलीस कोठडीत असणारे आमदार नितेश राणे यांच्यासह ३८ जणांना ओरोस येथील न्यायालयाने सर्शत जामीन मंजूर केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील गौण खनिजावर र्निबध घालत वाळू, चिरा, काळा दगड वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी चालविलेल्या कारवाईने त्रस्त झालेल्या सर्वपक्षीय डंपर चालक-मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी अनिल भंडारी आंदोलन बेदखल ठरवत असल्याने शनिवारी आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून आमदार नितेश राणेंसह ३८ जणांना न्यायालयात हजर केले असता १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान शिवसेना-भाजप पक्षाचे नेते खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, संदेश पारकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असता त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने डंपर आंदोलनातून शिवसेना-भाजपने माघार घेतली. त्यानंतर मनसेनेही माघार घेतली.
काँग्रेस-राष्ट्रवादीपुरते मर्यादित डंपर व्यावसायिक आंदोलनाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. राणे काल बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सिंधुदुर्ग नगरीत डंपर व्यावसायिक आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान दुपारी ३ वाजता आमदार नितेश राणे यांच्यासह ३८ जणांनाही मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांचाही समावेश आहे.
आमदार नितेश राणेंसह ३८ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. आमदार राणे यांना विधिमंडळ अधिवेशन काळानंतर पोलीस ठाण्यात आठवडय़ाने एकदा हजेरी लावण्याची अट घालण्यात आली. अन्य सर्वाना आठ जणांचा एक ग्रुप अशा प्रत्येक ग्रुपने आठवडय़ात एकदा हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली.