Nitesh Rane : महाराष्ट्राचे भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना ग्रामसभेच्या निर्णयावर आक्षेप कसा काय घेता असा सवाल केला आहे. २१ फेब्रुवारीला मढी या ठिकाणी ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र या प्रस्तावाविरोधात मुस्लिम व्यापारी जेव्हा गटविकास अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यांनी हा ठराव घटनेला धरुन नाही असं सांगत त्या निर्णयला स्थगिती दिली. ज्यानंतर नितेश राणे यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
ग्रामसभेत काय ठराव झाला?
ग्रामसभेत झालेल्या ठरावाबाबत सरपंचांनी माहिती दिली. ते म्हणाले, “मढीच्या यात्रेतले बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत. यात्रेच्या या काळात महिनाभर देवाला तेल लावलेलं असतं. हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि पलंगही वापरत नाही. पण गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावतात. याच कारणामुळे आम्ही मुस्लिम व्यापाऱ्यांना या यात्रेत बंदी घालण्याचा ठराव केला आहे.”
गट विकास अधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती
मढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसत असून याबाबत गटविकास अधिकार्यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समिती नोंदवणार आहे. दरम्यान नितेश राणे यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांनाच या प्रकरणी धारेवर धरलं आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार सत्तेत आहे हे गटविकास अधिकाऱ्यांना ठाऊक नाही का? जर ग्रामसभा घेऊन एखादा निर्णय मढी गावातल्या गावकऱ्यांनी घेतला आहे तर त्या निर्णयाला गटविकास अधिकारी स्थगिती कशी काय देऊ शकतात? माझं गावकऱ्यांना सांगणं आहे की त्यांनी एक ठराव तयार करुन त्यावर सगळ्या ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या पाहिजेत. तसं झाल्यास मी बघतोच की गटविकास अधिकारी हा ठराव कसा नाकारतात?” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी अहिल्यानगरचा दौरा केला होता. त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.