शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साधू संत आणि हिंदू देवी-देवतांच्या बाबतीत सुषमा अंधारे यांनी वक्तव्ये केलेली व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीका करण्यात येत आहे. तर, अंधारेंविरोधात वारकरी समाज आक्रमक झाला आहे. सुषमा अंधारेंच्या राजीमान्याचीही मागणी करण्यात येत आहे.
सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर वारकरी समाजाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन केली आहेत. ठाणे, कल्याण-डोबिंवलीमध्ये सुषमा अंधारेंच्या निषेधार्थ आज ( १७ डिसेंबर ) बंद पुकारण्यात आला आहे. त्यातच आता भाजपाचे आमदार नितेश राणेंनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे.
हेही वाचा : “स्वत:ला बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे तोतये समजतात, पण…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
ट्वीट करत नितेश राणे म्हणाले, “ज्या अर्थी महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणात अंधारे बाईंचा विरोध होऊनही.. हिंदू देवीदेवता आणि महान संतांबद्दल अंधारेंनी गरळ ओकण्याचे पुरावे समोर आल्यानंतरही.. उद्धव ठाकरे त्यांचं साधं निलंबन किंवा राजीनामा द्यायला सांगत नाहीत.. याचा हाच अर्थ.. ठाकरेंची मूक सहमती आहे!”, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “…तर आपणही यांच्यासारखं मंत्री बनून शाब्दीक भीक मागत असतो”, उद्धव ठाकरेंनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार
“राजीनामा देण्यास तयार पण…”
राजीनाम्याची मागणी करण्यात आल्यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यासाठी माझा पक्ष महत्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर कुठूनही करु शकते. मी पक्षाबाहेर काम केलं तर भाजपासाठी पळता भुई थोडी करेन. पक्षाने आदेश दिल्यास राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, माझा राजीनामा घेण्याआधी तुम्ही राज्यपालांचा राजीनामा घेणार का? माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. मग, गेली १० ते १५ वर्षे ही लोकं कुठे होती,” असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.