राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने जानेवारी महिन्यात छापेमारी केली होती. शुक्रवारी याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. मुश्रीफांच्या पुणे आणि कोल्हापूर येथील घरांवर शुक्रवारी ईडीने धाडी टाकल्या. या छापेमारीनंतर विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपा नेते ही छापेमारी कशी योग्य आहे ते सांगत आहेत.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांना या छापेमारीबद्दल विचारले असता राणे म्हणाले की, “ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग या संस्था भाजपाच्या काळात जन्माला आल्या आहेत का? या संस्था यूपीएच्या काळापासून चालत आल्या आहेत. एसआयटीने पूर्वी नरेंद्र मोदींची चौकशी केली होती. भाजपा नेत्यांवर सीबीआय आणि ईडीच्या धाडी पडायच्या, त्यांचीदेखील चौकशी झाली आहे.”
राणे म्हणाले की, “हे अधिकारी केवळ चौकशी करतात, विचारपूस करतात, त्यांना एखादं आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण सापडलं असेल म्हणून मुश्रीफांवर ही छापेमारी सुरू असेल. आर्थिक गैरव्यवहार सापडल्याशिवाय ईडी अशी छापेमारी करू शकत नाही. कोणाला याची अडचण असेल तर त्यांनी कोर्टात जावं. तुम्ही चोरी केली असेल, भ्रष्टाचार केला असेल तर तुमच्याकडे ईडीचे अधिकारी चहा प्यायला येणारच.”
हे ही वाचा >> व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला दीड तास मारहाण, मग प्रायव्हेट पार्ट पेटवले, आजारामुळे गेल्याचे सांगत अंत्यविधी उरकले, पण…
मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे का…? : नितेश राणेंचा सवाल
नितेश राणे म्हणाले की, या संस्था भाजपाने जन्माला घातलेल्या नाहीत. या संस्था आधीपासूनच आहेत. गैरव्यवहार झाला असेल तर चौकशी करतात, तपास करतात, त्यात काही सापडलं नाही तर सोडून देतात. तुमच्या नेत्यांवर तुमचा विश्वास नाही का? हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे का, की त्यांनी गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार केला आहे. त्यांना अटक होणार असा काही गैरसमज आहे का?