मागील अनेक दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांमर्फत चौकशी केली जात आहेत. त्यात उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. नाईकांवरील या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले असून नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधातील पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तसेच चौकशीला समोरे जायचे. मोर्चा काढून काय होणार आहे, असेही राणे म्हणाले आहेत. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; BJP उपाध्यक्षांना लक्ष्य करताना म्हणाले, “पूजा चव्हाणला…”
“वैभव नाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात एसीबीची चौकशी का केली जात आहे. वैभव नाईक यांनी चौऱ्या करायच्या, भ्रष्टाचार करायचा, बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे. तरीदेखील नाईक यांच्या बाजूने हे नेते उभे राहात आहेत. २००९ ते २०१९ या काळात बेहिशोबी मालमात्ता का वाढली, हे नाईक यांनी सांगावे. नाईक यांच्यावर जनतेची जबाबदारी आहे. मी स्वच्छ आहे, हे नाईक यांनी सांगायला हवे होते. माझी सर्व संपत्तीचा हिशोब आहे. मी सगळे कर भरतो असे नाईक यांनी सांगायला हवे होते,” असे नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा >>>“अहो नारायण राणे, तुम्ही ३९ वर्ष…”, राणे पिता-पुत्रांची नक्कल करत भास्कर जाधवांचा खोचक टोला!
“स्वत:ला लपवण्यासाठी सामान्य शिवसैनिकाला वेठीस धरले जात आहे. स्वत:ची चोरी लपवण्यासाठी पक्षाला वेठीस धरले जात आहे. वैभव नाईक यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. एसीबी, सीबीआय, ईडी, आयटी या नामांकित संस्था आहेत. या संस्था कोणत्याही विषयाची चौकशी करतात तेव्हा त्यांच्याडे पुरावे असतात. त्यांच्याकडे संबंधित व्यक्तीचे पुरावे असतात. त्याशिवाय ते चौकशी करत नाहीत. आमच्याही चौकशा झालेल्या आहेत. या चौकशींदरम्यान आम्ही माहिती दिलेली आहे,” असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.