भाजपा आमदार नितेश राणे सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटावर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. ‘मातोश्री’बद्दल (उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) राणे सतत वेगवेगळे दावे करत असतात. तर कधी ठाकरे कुटुंबावर आरोप करतात. नितेश राणे यांनी आज (३० एप्रिल) पुन्हा एकदा ‘मातोश्री’वर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी मातोश्रीवर घडणाऱ्या अनेक घटनांना संजय राऊत जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
नितेश राणे म्हणाले, संजय राऊतने युवा सेना प्रमुख पदावरून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोन भावांमध्ये भांडणं लावली आहेत. महाविकास आघाडीत आदित्य ठाकरेचं प्रस्थ वाढू लागलं आहे. तर शिवसेनेत आदित्य, त्याची नाईट लाईफ गँग आणि वरुण सरदेसाईचा प्रभाव वाढतोय. हे लोक ताकदीने वाढतायत हे संजय राऊतच्या लक्षात आल्यावर त्याने आणि त्याच्या टोळीने आदित्य ठाकरेंविरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला.
आमदार नितेश राणे म्हणाले, युवा सेना प्रमुख म्हणून वरुण सरदेसाईचं नाव पुढे येत होतं, पण अचानक ते नाव गायब झालं. वरुण युवा सेना प्रमुख होणार होता. परंतु आदित्य आणि वरुणची ताकद वाढणार मग आमचं काय होणार? आमची दुकानं बंद होणार. या भितीने लगेच तेजस ठाकरेच्या नावाने सामना या मुखपत्रात जाहिराती छापून आणल्या. तेजसचे ठाकरे याचे युवा सेना प्रमुख म्हणून बॅनर छापले. शिवसैनिकांना महाराष्ट्रभर असे बॅनर लावायला सांगितलं. त्यामुळे या दोन्ही भावांमध्ये (आदित्य आणि तेजस) भांडणं लागली.
हे ही वाचा >> “केंद्रातून फोन आल्यावर…”, बारसू रिफायनरीबाबत प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले “कोकणाची…”
आमदार राणे म्हणाले, आम्ही असं ऐकलंय की युवा सेना प्रमुख पदावरून तेव्हा मातोश्रीवर दोन्ही भावांमध्ये भांडणं सुरू झाली. त्यामुळे काही वेळासाठी तेजस ठाकरे कर्जतच्या फार्म हाऊसवर राहायला गेला. हा संजय राऊत ज्या मालकाचं मीठ खातो, पगार घेतो त्याच्याच घरात आग लावण्याचं काम करतो. संजय राऊत मोठा काटा आहे, तो मोठा आगलाव्या आहे.