भाजपा आमदार नितेश राणे सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटावर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना लक्ष्य केलं. तसेच उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचं कामही केलं. नितेश राणे म्हणाले, “संजय राऊतने युवा सेना प्रमुख पदावरून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोन भावांमध्ये भांडणं लावली आहेत. महाविकास आघाडीत आदित्य ठाकरेचं प्रस्थ वाढू लागलं आहे. तर शिवसेनेत आदित्य, त्याची नाईट लाईफ गँग आणि वरुण सरदेसाईचा प्रभाव वाढतोय. हे लोक ताकदीने वाढतायत हे संजय राऊतच्या लक्षात आल्यावर त्याने आणि त्याच्या टोळीने आदित्य ठाकरेंविरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला. सामना या मुखपत्राचा वापर करून त्याने आदित्य आणि तेजस ठाकरेंमध्ये भांडणं लावली.”
दरम्यान, नितेश राणे यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राणे म्हणाले की, २०१९ ला संजय राऊतने मुख्यमंत्रीपदासाठी पवार साहेबांच्या (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार) माध्यमातून स्वतःच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार, पवार साहेब उद्धव ठाकरे यांना म्हणाले. त्यांनी प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला. परंतु उद्धव ठाकरेंच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यामुळे त्यांनी संजय राऊतचं नाव नाकारलं.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपलं नाव नाकारल्यापासून संजय राऊतचं हे षडयंत्र सुरू झालं आणि त्याची नाटकं सुरू झाली. मुळात हा घरात घ्यायच्या लायकीचा नाही. हा दुसऱ्यांचे बाप काढतो, पाय कुठे आहेत ते विचारतो. याचं राजकारणं स्थान काय आहे? दुसऱ्यांच्या घरात हा आग लावण्यापलिकडे काही करू शकत नाही.
हे ही वाचा >> “केंद्रातून फोन आल्यावर…”, बारसू रिफायनरीबाबत प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले “कोकणाची…”
नितेश राणे म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना सांगतो, तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचं असेल तर याला (संजय राऊत) घरात घेणं बंद करा. हा तिथेही आग लावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती बाहेर फिरतेय.