महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये लहान-मोठ्या दंगली उसळल्याचं पाहायला मिळालं. राम नवमीच्या दिवशी राज्यात तीन – चार ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटांमध्ये राडा झाला. या राड्याचं रुपांतर दंगलीत झालं. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच दंगलखोरांनी काही दुचाकी आणि चारचाकी वाहनंही पेटवली. या घटनेत दोन्ही गटांमधील १० जणांसह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. यानंतर अहमदनगरच्या शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजात आक्षेपार्ह घोषणांमुळे राडा झाला. त्यानंतर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. या दंगलींवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दंगलींप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. यानंतर आज (मंगळवार, १६ मे) भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या दंगलींवरून गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले, काल विरोधी पक्षनेते अजित दादांनी सांगितलं, या दंगलींचा मास्टमाईंड शोधा. मी दादांना सांगेन या दंगली होतायत त्याचा मास्टरमाईंड तुमच्या सिल्व्हर ओकवर (शरद पवार यांचं निवासस्थान) काही दिवसांपूर्वी आला होता. तुमच्यासोबत बसलेला. पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला. त्याचा पत्ता कलानगरमध्ये आहे.
नितेश राणे यांनी या दंगलींचे सूत्रधार हे उद्धव ठाकरे असल्याचं म्हटलं आहे. कारण उद्धव ठाकरेंचं मातोश्री हे निवासस्थान वांद्रे येथील कलानगरमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर गेले होते. तिथे ते अजित पवारांच्या शेजारी बसले होते.
हे ही वाचा >> अकोल्यात ‘त्या’ रात्री काय घडलं? नाना पटोलेंनी सांगितला दंगलीचा संपूर्ण घटनाक्रम, गृहमंत्री फडणवीसांना म्हणाले…
आमदार नितेश राणे म्हणाले, मी वारंवार सांगतोय, दंगली घडवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ज्या सुप्त डोक्यातून आलेली. ती इच्छा आणि ते स्वप्न आजही मेलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा हे मी सातत्याने सांगतोय. १९९३ च्या दंगलीनंतर १९९५ ला राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आली असं म्हणणारे ठाकरे २००४ ला परत तोच प्रयत्न करत होते.