देशभरातील विविध पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील पक्षांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत आगामी लोकसभेच्या जागांच्या जागावाटपावर चर्चा सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. महाविकास आघाडीतले तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये लोकसभेच्या जागांवरून बैठकांचं सत्र सुरू आहे. तसेच लोकसभेनंतर काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या जागांबाबत तिन्ही पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. अशातच भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेबद्दल (ठाकरे गट) मोठा दावा केला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले, एक वर्षात उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्ष बांधणं शक्य नाही. मुळात तो त्यांचा पिंड नाही. तसेच त्यांना आगामी निवडणुकीत पक्षचिन्हदेखील मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, आमदार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, अशी माझी खात्रीलायक माहिती आहे.
आमदार राणे म्हणाले, ठाकरे गटाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निडणूक लढावेत यासाठी स्वतः खासदार संजय राऊत दोन वेळा प्रस्ताव घेऊन गेले आहेत. हे खरं की खोटं ते संजय राऊतांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचे आमदार येणारी निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत. तशी तयारी त्यांनी आता करावी. हे मशाल चिन्ह राहणार नाही. संपूर्ण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. तशी तयारी संजय राऊतांनी केली आहे.
हे ही वाचा >> “…मग मंदिरातले पुजारी उघडे का? त्यांनीही सदरा घालावा”, ड्रेसकोड वादावर छगन भुजबळांची परखड भूमिका!
नितेश राणे म्हणाले, जागावाटपाचं नाटक करण्यापेक्षा खरी परिस्थिती उभाटा सेनेने सांगावी. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करायचं त्यांचं प्लॅनिंग आहे. त्यानंतर मोठ्या आणि अधिक जागा काँग्रेसकडून मागायच्या असं त्यांचं ठरलं आहे. हे जे काही राजकारण सुरू आहे, ते आज ना उद्या बाहेर येणार आहे. मला माझ्या काँग्रेसमधील मित्रांना सांगायचं आहे की, उद्याची तयारी ठेवा. ही जी काही नाटकं सुरू आहेत, त्यासाठी तयार राहा. संजय राऊत स्वतः पक्ष विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा सिल्व्हर ओक (शरद पवार यांचं निवासस्थान) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेऊन गेले आहेत.