घोषणाबाजी, पोस्टरबाजी, हाणामारी, गुन्हे, आरोप प्रत्यारोप हे मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गोष्टी आहेत. अर्थात या चर्चांना कारण आहे राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेली टीका आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक व सुटका प्रकरणानंतर सलग तिसऱ्या दिवशीही शिवसेना विरुद्ध राणे हा शाब्दिक संघर्ष सुरु आहे. एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर टीका केली असतानाच दुसरीकडे राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एक फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.

नितेश राणे यांनी एका बॅनरचा फोटो, “एक आठवण” या कॅप्शनसहीत शेअर केला आहे. या फोटोमध्ये झळकावण्यात आलेल्या बॅनरवर २५ वर्ष रौप्य महोत्सव, ५० वर्ष सुवर्ण महोत्सव, ६० वर्ष हिरक महोत्सव, ७५ वर्ष अमृत महोत्सव, १०० वर्ष शताब्दी महोत्सव अशी यादीच देण्यात आलीय. तसेच खाली “महाराष्ट्रात काहींना माहिती नाही यासाठी जनहितार्थ” असं लिहिलेलं आहे. या मजकूराखाली तीन स्मायलीही छापण्यात आले आहेत. पण हा बॅनर कोणी आणि कुठे लावलाय हे मात्र समजू शकलेलं नाही.

नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्यानंतर दादरमध्ये नारायण राणेंचे मोठ्या आकाराचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले होते ज्यावर ‘कोंबडी चोर’ असं लिहिलं होतं.  स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासात हे पोस्टर हटवले होते.

कालावधीचं कनेक्शन काय?

नारायण राणे यांना झालेली अटक आणि सुरु असणाऱ्या वादामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टच्या भाषणामध्ये केलेलं वक्तव्य कारण ठरलं. सोमवारी रायगडमधील महाड येथे राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्याचवेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाचा उल्लेख करत, “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं म्हटलं होतं.

“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.

Story img Loader