राज्यामध्ये हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रकृतीच्या कारणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेमध्ये उपस्थित राहिले नाहीत. याच मुद्द्यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्र्यांनी चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा अशी मागणी केली. या टीकेवरुन सत्ताधारी पक्षांनीही भाजपावर निशाणा साधत आजारी व्यक्तीसंदर्भात असं वक्तव्य करणं विकृतपणाचं असल्याचं म्हटलंय. हा वाद सुरु असतानाच आता भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही अशी टीका केलीय.
सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री अनुपस्थित असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता नितेश राणेंनी राज्य कोण चालवतंय असा प्रश्न उपस्थित केला. “आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाहीय. मुख्यमंत्री आजारी आहेत आम्ही असं ऐकलेलं आहे. पण राज्याचं अधिवेशन सुरु आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाहीयत तर नेमकं राज्य कोण चालवत आहे?, मुख्यमंत्री चालवतायत की दुसरं कोणी चालवतंय?”, असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केलाय.
“राज्याचा चार्ज कोणाकडे दिलाय हेच आम्हाला माहिती नाहीय. आता कुठे लोक सांगतायत आणि असं ऐकलंय की रश्मी ठाकरेंना भविष्यात मुख्यमंत्री बनवणार आहेत. ते तरी जाहीर केला. ते तरी खरं आहे का सांगा? जेणे करुन आम्ही कानावर ज्या बातम्या पडतायत त्या ऐकून तरी आम्ही आशेत राहू की आम्हाला मुख्यमंत्री मिळेल. अधिवेशन सुरु असताना चार्ज कोणाकडे दिलाय?,” अशी विचारणाही नितेश राणेंनी केलीय.
नक्की वाचा >> मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन बोलणाऱ्यांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “आपला बाप आजारी असताना आपण…”
पुढे बोलताना ठाकरे कुटुंबाचा स्वपक्षीय नेत्यांवरही विश्वास राहिला नसल्याची टीका नितेश राणेंनी केलीय. “स्वपक्षाच्या एकाही नेत्यावर ठाकरे कुटुंबाचा विश्वास राहिलेला नाही. ना एकनाथ शिंदे, ना सुभाष देसाई कोणावरही विश्वास राहिलेला नाही. अशा अवस्थेत अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा मिळणार हे तरी सांगावं,” असं नितेश राणे म्हणालेत.
नक्की वाचा >> “अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता करणार आहात का?”
देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारने जो गोंधळ घालून ठेवलाय, जी रोखशाही सुरु केलीय त्याबद्दल आम्ही आजपासून अधिवेशनात परखड भूमिका घेणार आहोत, असंही नितेश राणेंनी स्पष्ट केलंय.
“सत्तेत आल्यापासून सरकारमध्ये धाडसच नाहीय की जनतेसमोर जावं. आम्हाला आमदार म्हणून निवडणून दिलं जातं कारण आम्ही जनतेसमोर जाऊन त्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये विधीमंडळासमोर विचारले पाहिजेत. पण अधिवेशनच आठ आठ दिवस चालणार असेल त्यात दोन दिवस नाताळाची सुट्टी, त्यात मुख्यमंत्री पण नाही. तर तिथे अधिवेशन काय नुसतं एअर कंडिशनमध्ये झोपण्यासाठी सुरु ठेवलं आहे का? याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं,” अशी मागणीही त्यांनी केलीय.