शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.

या अगोदर त्यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला होता. तसेच, ते न्यायालयासमोर शरण देखील आले होते. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे, असं सांगितलं होतं.

Live Updates

Nitesh Rane Surrender: जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेतला असून शरण गेले आहेत.

17:58 (IST) 2 Feb 2022
आमदार नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले त्यानंतर युक्तिवाद झाला. न्यायालयाने येत्या दि.४ फेब्रुवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.

17:19 (IST) 2 Feb 2022
सरकारी पक्षाने नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली

नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत. परंतु, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही? याबाबत अद्याप गोंधळ कायम आहे.

17:16 (IST) 2 Feb 2022
दिवाणी न्यायालय कणकवली कोर्टाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात

दिवाणी न्यायालय कणकवली कोर्टाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर काहीही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे

17:06 (IST) 2 Feb 2022
निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर ओरोस सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाबाहेर माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचाही भंग केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16:08 (IST) 2 Feb 2022
अमित शाह यांचं उदाहरण देत नितेश राणे यांचं सूचक ट्वीट, म्हणाले…

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच, ते आता न्यायालयासमोर शरण देखील होत आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. शिवाय, नितेश राणे यांनी एक सूचक ट्वीट देखील केलं आहे. यामध्ये त्यांनी समय बडा बलवान है.. असं म्हटलं आहे.

16:02 (IST) 2 Feb 2022
सरकारी पक्षाकडून पोलीस कोठडीची मागणी

नितेश राणे यांना पोलीस कोठडी दिली जावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वकीलांकडून करण्यात आली आहे.

15:58 (IST) 2 Feb 2022
नितेश राणेंची जामीन प्रक्रिया सुरू

नितेश राणे हे  सिंधुदुर्ग सत्र न्यायलयात शरण आले आहेत. नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत. 

15:45 (IST) 2 Feb 2022
“मी सरेंडर होण्यासाठी जातोय” म्हणत नितेश राणे कोर्टाच्या दिशेने रवाना

''काल सेशन कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण मी आज स्वत:हून, कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वत: सरेंडर होण्यासाठी जात आहे.'' असं नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितलं. यानंतर ते कोर्टाच्या दिशेने रवाना देखील झाले.

15:44 (IST) 2 Feb 2022
मोठी बातमी ! नितेश राणेंनी हायकोर्टातील जामीन याचिका घेतली मागे, तपास अधिकाऱ्यासमोर जाणार शरण

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं होतं.

नितेश राणेंचा जामीन अर्ज मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला.