शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात असलेलं वैर आता जगजाहीर आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यापासून तर त्यांच्या शिवसेना विरोधाला अधिकच धार चढल्याचं दिसून येत आहे. आज सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, त्याआधीच चिपी विमानतळाचं श्रेय नेमकं कुणाचं? यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विमानतळाबाबत शिवसेनेकडून कोकणात मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी सुरू असून दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील विमानतळाचं श्रेय आमचंच, असा हुंकार भरला आहे. या पार्श्वभूमीवर आता नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून या मुद्द्यावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचं निमंत्रण विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच न पाठवल्याचा राग भाजपाकडून व्यक्त केला जात आहे. त्यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. “ही तीच शिवसेना आहे, जी चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागली होती. आणि आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्याचं देखील सौजन्य दाखवलं नाही”, असं नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“हीच आहे उद्धव सेना”

दरम्यान, शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव सेना’ असा करत नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमधून टोला लगावला आहे. ट्वीटमध्ये नितेश राणे पुढे म्हणतात, “उद्धव सेना म्हणजे हेच तर आहे. पण हा फक्त काही काळाचा प्रश्न आहे. हिसाब तो जरूर होगा!”

“जाहीर सभेत मी भांडाफोड करणार”, चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी नारायण राणेंचा इशारा!

“हा आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशीर्वादच”

“६-७ वर्ष तुम्ही भाजपासोबत सत्तेत होता. भाजपासोबत चांगले संबंध होते. अरविंद सावंत कॅबिनेट मंत्री होते. मग त्या वर्षांमध्ये याच्या परवानग्या का नाही मिळाल्या. आम्हाला कुणाचं श्रेय घेण्याची गरजच नाही. राणे साहेबांचं स्वप्न पूर्ण करत असातान बाळासाहेबांचा मुलगा व्यासपीठावर आहे हा आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे”, अशी प्रतिक्रिया देखील नितेश राणेंनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Story img Loader