राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा आरोप करत दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
यावर बुधवारी ( १९ ऑक्टोंबर ) न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र, गौरी भिडे यांची याचिका स्वीकारण्यास कोणीही वकील तयार नसल्याने, १६ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.
यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “गौरी भिंडेंनी ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तींच्या चौकशीविषयी याचिका दाखल केली आहे. मात्र, मनसुख हिरेन, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांची संशयास्पद हत्या किंवा मृत्यू झाले. त्यानंतर त्याचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले. तशा प्रकारचा धोका गौरी भिडे यांना भेडसावू शकतो, म्हणून राज्य सरकराने याची काळजी घ्यावी. एक साधा फोटोग्राफर एवढी संपत्ती कशी जमवू शकतो,” असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.