वाळूतस्करीच्या विरोधात बातम्या छापणाऱ्यांचा काटाच काढील, अशी धमकी देणाऱ्या नितीन रमेश अडसूळ या पारनेर शहरातील कुविख्यात वाळूतस्कराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर मात्र चांगलाच थयथयाट केला. या गुन्हय़ात न्यायालयाने एक दिवसाची कोठडी दिल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत हंबरडाच फोडला. शुक्रवारी तो पारनेर पोलिसांच्या स्वाधीन झाला.
वाळूचोरीच्या पैशातून मस्तवाल झालेल्या नितीन याने मुळा नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी केली आहे. महसूल तसेच पोलीस यंत्रणेस आव्हान देऊन त्याने या व्यवसायात आपली हुकमत गाजवली होती. आजवर महसूल तसेच पोलीस यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरल्याने त्याचे फावले होते.
यांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने नागापूरवाडीत वाळूचोरी करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने कारवाई केल्यानंतरही नितीन व त्याच्या सहकाऱ्यांनी दांडगाई करून या पथकास हुसकावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निवासी जिल्हाधिकारी सदानंद जाधव यांनी खंबीर भूमिका घेत दोन पोकलेन तसेच एक जेसीबी तसेच वाहनांवर कारवाई करून उपसरण्यात आलेल्या वाळूचाही पंचानामा केला. पथकाच्या कामात अडथळा आणल्याची तक्रार करण्यात येऊन तब्बल साडेतीन कोटी रुपये किमतीच्या गौणखनिजाची चोरी केल्याचा गुन्हा पारनेर पोलिसात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीनचे अन्य सहकारी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. नितीन मात्र अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत होता. परंतु त्यात अपयश आल्याने शुक्रवारी दुपारी त्याने पोलिसांपुढे शरणागती पत्करली. नितीन यास शनिवारी न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.