Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडीओत गळफास घेऊन जीवन संपवले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीतील सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यामुळे त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर तेथील स्थानिक आमदार महेश बालदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एन. डी स्टुडिओ आर्थिक विवंचनेत होता, असं त्यांनी यावेळी सांगितलं. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
उरण खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी म्हणाले की, “नितीन देसाई मोठा माणूस होता. मोठा कलाकार होता. त्यांचा एन. डी स्टुडिओ आर्थिक विवंचनेत होता हे जगजाहीर आहे. त्यामळे त्यांच्या आत्महत्येला आर्थिक कारण आहे असं तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.”
हेही वाचा >> एन. डी. स्टुडिओला २०२१ मध्ये लागली होती भीषण आग; सुबोध भावे म्हणाला, “छोट्या-मोठ्या संकटांना…”
“दीड महिन्यांपूर्वीच त्यांच्याशी भेट झाली होती. पुढे चांगले दिवस येतील. दोन चार चित्रपट चालू होणार आहेत असे ते अपेक्षित होते”, असंही बालदी यांनी पुढे सांगितलं. ते म्हणाले की, “नितीन देसाईंनी स्थानिकांनाच काम दिलंय, त्यामुळे एनडी स्डुडिओमध्ये स्थानिक मुलंच कामाला होते.”
इंडस्ट्रीने पाठ फिरवली
“एन. डी स्टुडिओच्या व्यवहारामुळे ते अडचणीत आले. आर्थिक तंगी हे कारण स्पष्ट आहे. स्टुडिओ चालत नाहीय. इंडस्ट्रीने पाठ फिरवली आहे. आता लोक येत आहेत, पावसानंतर शूटींग चालू होतील, असं नितीन देसाई म्हणाले होते”, असं आमदार महेश बालदी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
कष्टाने उभारलेल्या स्टुडिओतच नितीन देसाईंची आत्महत्या
‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ अशा चित्रपटांसाठी भव्य आणि देखणे सेट नितीन देसाई यांनी उभारले होते. हिंदी आणि मराठीतील ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हणजे नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि भव्य सेट्स हे समीकरणच बनले होते. पुढे हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी २००५ साली कर्जत येथे भव्यदिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला. चित्रपटातील भव्य दिव्य सेट्सची ही अद्भुत दुनिया एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांनाही खुली करून दिली होती. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर काम केले होते. राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकेबरोबरच बालगंधर्व या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.
आज सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना ND स्टुडीओमध्ये सापडला आहे. आम्ही सर्व पैलू तपासून पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.