बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचं आता नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदय सम्राट असं म्हटलं जात होतं. तसंच उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली म्हणत एकनाथ शिंदेंनी उठाव केला. तर राज ठाकरे हे मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार आहेत असं सांगत असतात. दरम्यान नितीन गडकरी यांनी आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड
महाराष्ट्राच्या राजकारणात जून २०२२ मध्ये शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला म्हणजेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हंही दिलं. महाविकास आघाडीचा प्रयोग म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची सत्ता महाराष्ट्रात अडीच वर्षे होती. मात्र ही महाविकास आघाडी मान्य नसलेल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर राज्यात जी विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली त्या निवडणुकीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा यांच्या पक्षांना म्हणजेच महायुतीला २३७ जागा मिळाल्या. दरम्यान बाळासाहेबांचे विचार घेऊन मी बाहेर पडलो असं एकनाथ शिंदे सांगतात. तर राज ठाकरे हे मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार आहे असं म्हणाले होते. तर शिवसेना एकच आहे आणि ती माझ्या वडिलांनी स्थापन केलेली शिवसेना हे उद्धव ठाकरे कायमच म्हणतात. दरम्यान बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण? यावर नितीन गडकरी यांनी आता भाष्य केलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण?
बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. तसंच राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांशीही माझे चांगले संबंध आहेत. कोण उत्तराधिकारी आहे हे तर मी सांगू शकत नाही ते जनताच ठरवेल. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहे. राजकारण बदलत जातं पण मैत्री संपत नसते. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. राज आणि उद्धव ठाकरेंशी माझे चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत. आता बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण हे जनतेला ठरवू द्या असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. टीव्ही ९ भारतवर्षच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.
हिंदूहृदयसम्राट नेमकं कोण?
यानंतर हिंदूहृदय सम्राट कोण? असाही प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला. तसंच बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण आडवाणी, अशोक सिंघल असे तीन पर्याय देण्यात आले. त्यावर नितीन गडकरी म्हणाले हे तिघंही हिंदूहृदय सम्राट आहेत. तिघांनी देशाच्या अस्मितेसासाठी आणि हिंदुत्वासाठी योगदान दिलं आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.