सांगली : आत्मनिर्भर, विश्वगुरु, जागतिक स्तरावर उच्च अर्थव्यवस्था या गोष्टी साध्य करायच्या असतील तर आपणाला युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शानुसार स्वत:पासून सुरुवात करावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगली येथे केले.

मराठा समाज संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खा. विशाल पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी खा. राजू शेट्टी महादेव जानकर आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्वागताध्यक्ष माजी खा. संजय पाटील यांनी स्वागत तर संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा >>>Raj Thackeray: “संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…”, मंत्रालयात आमदारांनी जाळीवर उड्या मारल्यानंतर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज युगप्रवर्तक होते. त्यांनी सहिष्णुता, सौहार्दता जपत सर्व धर्माबद्दल समभाव राखला. हे विचार काळाच्या कितीतरी पुढचे आहेत. इतिहासातील भूतकाळाचे स्मरण करत भविष्यकाळ घडविण्यासाठी वर्तमानात कृती करावी लागते. अलीकडच्या काळात जात, पैसा आणि गुन्हेगारी यावर राजकारण चालत असले तरी समाज घडविण्यासाठी महाराजांचे विचार महत्त्वाचे ठरतात. महाराजांचे कर्तृत्व तरुण पिढीसमोर ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.

मराठा समाज संस्थेचा इतिहास मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचाराने वाटचाल सुरु आहे. हिंदवी स्वराज्य रयतेचे राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केले. पडेल ती किंमत देण्याची मराठा समाजाची तयारी असते. सैन्य दलात अनेक रेजिमेंट असल्या तरी मराठा रेजिमेंटचे नाव अदबीने घेतले जाते असे खा. पवार यावेळी म्हणाले.

Story img Loader