Nitin Gadkari : नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. शनिवारीच त्यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात एक विधान केलं होतं ज्याची चांगलीच चर्चा झाली. राजाने टीका सहन केली पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं. नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता नितीन गडकरींनी ( Nitin Gadkari ) केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंबाबतही एक महत्त्वाचं विधान केलं आहे. नागपुरातल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी रामदास आठवलेंबाबत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवलेंना गडकरींच्या हस्ते पुरस्कार

मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रविवारी नागपुरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणात आतापर्यंत तीनवेळा केंद्रात मंत्रीपद मिळालं आणि चौथ्यांदा सरकार आल्यावर मंत्री होणारच असे मत व्यक्त केलं. ज्यानंतर एकच हशा पिकला. तसंच रामदास आठवले हे राजकारणातले हवामान तज्ज्ञ आहेत असंही नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले.

नितीन गडकरी आठवलेंबाबत काय म्हणाले?

नितीन गडकरी म्हणाले, “आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी आहे. सरकार कोणाचेही आलं तरीही रामदास आठवले यांचं मंत्रिपद पक्कं आहे. रामदास आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते आहे याचा अंदाज येतो. लालूप्रसाद यादव हे ही रामविलास पासवान यांच्याबद्दल तसंच म्हणायचे”,अशी आठवण नितीन गडकरींनी ( Nitin Gadkari ) त्यांच्या भाषणात सांगितली.

हे पण वाचा- Nitin Gadkari : “राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

गडकरींच्या आठवलेंना शुभेच्छा

यानंतर नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले, “मी रामदास आठवलेंना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आयुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त व्हावं. अशी आपणा सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो. मला विश्वास आहे की, त्यांचं आयुष्य त्यांनी दलित, पीडित आणि शोषित माणसांसाठी दिलेलं आहे. या माध्यमातून ते सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यात यशस्वी होतील.”

रामदास आठवले काय म्हणाले?

यानंतर रामदास आठवले यांचंही भाषण झालं ते म्हणाले, “संविधान जो मानत नसेल त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. कायद्यात बदल किंवा दुरुस्ती म्हणजे संविधान बदलणे नाही. तसंच मनोज जरांगेंची मागणी ही रास्त मागणी आहे. मात्र राज्याला हा अधिकार नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग तयार करता येईल का यावर विचार व्हावा. विधानसभेसाठी १० ते १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे, चंद्रपूरची जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत, असंही रामदास आठवले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari big statement about ramdas athawale what did he say about him know the detail scj
Show comments