Nitin Gadkari chopper checked: शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे वणी आणि धाराशिव येथे सभा घेण्यासाठी गेले असताना त्यांची दोन वेळा बॅग तपासणी करण्यात आली. या तपासणीचा व्हिडीओ चित्रीत करून उद्धव ठाकरे यांनी व्हायरल केला. त्यामुळे या विषयावर बराच गदारोळ झाला. यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी सभा घेण्यासाठी आले असताना नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.
नितीन गडकरींच्या हेलिकॉप्टर तपासणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काल धाराशिव जिल्ह्यात जाहीर सभेसाठी गेले असताना उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासण्यात आली. निवडणूक आयोगाने यंदा कडक उपाययोजना राबविल्यामुळे अनेक नेत्यांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मात्र या तपासणीवर आक्षेप घेतला. फक्त विरोधी पक्षातील नेत्यांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा कधी तपासणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
हे वाचा >> “माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
मतदारांना भेटवस्तू, पैसे किंवा इतर आमिषे दाखविल जाऊ नयेत, यासाठी निवडणूक आयोगाकडून आचार संहितेच्या काळात तपासणी केली जात असते. उद्धव ठाकरे सोमवारी (११ नोव्हेंबर) यवतमाळमधील वणी येथे सभा घेण्यासाठी आले असताना त्यांची पहिल्यांदी बॅग तपासण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी लातूर जिल्ह्यात औसा येथे आले असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. औसा विधानसभेत आमदार दिनकर माने यांच्यासाठी त्यांनी प्रचारसभा घेतली.
शिवसेना उद्धव ठाकरे यांनी यावेळीही व्हिडीओ तयार करून पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर टाकला आहे. लातूर जिल्ह्यात किती लोकांची आतापर्यंत तपासणी केली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी तपासकर्त्यांना विचारला. यावेली तुम्हीच पहिले आहात, असे कर्मचारी म्हणाले. ‘मीच तुम्हाला पहिला कसा सापडतो?’, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.