केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्विग्न सवाल
रस्त्यावरील खड्डे वेळेत बुजवण्यात येत नसल्याने लाखो नागरिक दरवर्षी मरतात. खड्डे बुजवण्यासारखे किरकोळ काम देखील वेळेत पूर्ण केले जात नसेल तर मग याला जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याची तरतूद करावी काय, असा उद्विग्न सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. येथे शुक्रवारी इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या अधिवेशनात देश-विदेशातील बांधकाम अभियंते आणि तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.
गडकरी म्हणाले, रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यू यामुळे भारताची जगात बदनामी होत आहे. मी जेव्हा जागतिक परिषदेत जातो तेव्हा हा विषय प्रामुख्याने समोर मांडला जातो. अपघात कमी करण्याबाबत गोऱ्या लोकांचे मार्गदर्शन ऐकावे लागते. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात आणि दीड लाख लोक यात मृत्युमुखी पडतात. यात १८ ते ३५ वयोगटातील ६५ टक्के युवक आहेत. माझा देखील अपघात झाला आहे. तेव्हा मी अतिशय संवेदनशीलतेने सांगतो की, रस्त्यावरील धोकादायक वळणे, रस्त्यावरील झाड, खड्डे, अर्धवट सोडून दिलेले काम यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. काम सुरू करून चार-चार महिने कंत्राटदार बेपत्ता होतो. विदेशात एखाद्या कामासाठी रस्ता खोदल्यास त्याला नीट कठडे लावले जातात, तसेच तो खड्डा २४ तासात बुजवला जातो. आपल्या देशात मात्र अशा खड्डय़ांमुळे लोक मरतात. केबल किंवा इतर कामासाठी रस्ते खोदणारी एजन्सी महापालिका किंवा संबंधित संस्थेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी पैसे देते. पण खड्डे बुजवले जात नाहीत. अपघातात तीन-तीन लाख लोकांचे हातपाय तुटतात. ही उदासीनता टाळण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणाऱ्या अभियंत्यांची वर्गवारी करण्यात येणार आहेत. जे अभियंते चांगले काम करतात त्यांना सन्मानित केले जाईल आणि जे करत नाहीत, त्यांना नकारात्मक गुण दिले जातील, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.
अधिकारी नवीन तंत्रज्ञानास घाबरतात
जगभरात रस्ते बांधणीचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपल्याकडे मात्र पारंपरिक पद्धतीने रस्ते बांधणीवर भर दिला जातो. आपले अधिकारी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास घाबरतात. ही भीती घालवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावरील (पायलट प्रोजेक्ट) प्रकल्पात अभियंत्यांनी केलेल्या चुका माफ केल्या जातील, असेही गडकरींनी सांगितले.