शरद पवार हे महाराष्ट्राचे आधुनिक छत्रपती असून ते मिर्झाराजे जयसिंग यांच्याप्रमाणे औरंगजेबरूपी सोनिया गांधींच्या दरबारात चाकरी करीत आहेत हे या राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केली.
श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील बेलवंडी येथे झालेल्या सभेत गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार दिलीप गांधी होते. पाचपुते यांच्यासह बाबासाहेब भोस, प्रतिभाताई पाचपुते, विठ्ठलराव काकडे, सदाशिव देवगावकर, सदाशिव पाचपुते, विक्रम पाचपुते आदी या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, देशात मनमोहन सिंग व राज्यात पृथ्वीराज चव्हाण हे सारखेच आहेत. यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले. दादा, बाबा, आबा हे महाराष्ट्राचे राहू-केतू आहेत. काँग्रेसचे राधाकृष्ण विखे यांनीच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना सिंचनासाठी ७० हजार कोटी खर्च होऊनही सिंचन मात्र ०.१ टक्केच झाल्याची कबुली दिली आहे. मग हा जनतेचा पैसा कोणाच्या खिशात गेला, असा सवाल त्यांनी केला. देशातील क्रमांक एकचे राज्य कृषी क्षेत्रातदेखील मागे पडले असून अवघे तीन टक्के विकास दर आहे. आता नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व या देशाला मिळाले असून आम्ही शेतकऱ्यांसाठी इथेनॉलवर आधारित गाडय़ा काढणार असून त्यामुळे शेतीत क्रांती होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची एकहाती सत्ता भाजपच्या ताब्यात द्या, असे आवाहन त्यांनी केले.
बबनराव पाचपुते यांच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, त्यांच्या कारखान्यास मदत करणार आहोत असे सांगताना पाचपुते हे संघर्ष करणारे नेते असून, त्यांनी जनता पक्ष सोडल्यावर इतरत्र जाण्याची गरज नव्हती, मात्र ते आता स्वगृही परत आले असून स्थिर प्रवाहात आले आहेत, असे गडकरी म्हणाले.
पाचपुते यांनी या वेळी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी जाणीवपूर्वक आमचा कारखाना बंद पाडला असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांसाठी आपण भाजपत आलो, असे ते म्हणाले. सदाशिव पाचपुते, दिलीप गांधी, दीपक भोसले यांची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा