लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार सभांचा जोर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून स्टार प्रचारक म्हणून नितीन गडकरी प्रचासभा घेताना दिसत आहेत. शनिवारी नितीन गडकरींनी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
राजकारण म्हणजे पैशाचाच धंदा झालाय – नितीन गडकरी
नितीन गडकरींना आपल्या भाषणात आमदारांच्या वृत्तीवर बोट ठेवलं. राजकारण म्हणजे पैशाचा धंदा झालाय, असं गडकरी म्हणाले. “विकासाची कामं करायची असतील तर नेतृत्वाला दृष्टी असायला हवी. तुम्ही डोळे दान करू शकता, पण दृष्टी दान करू शकत नाही. विकासाची दृष्टी असायला हवी. पण आजकाल तर राजकारण म्हणजे पैशाचाच धंदा झालाय. मला जास्त बोलता येत नाही. पण ही माझी फार तीव्र भावना आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
“आमदार म्हणतात, पेहेले माल दो, फिर काम लो”
“मी १० वर्षांत ५० लाख कोटींची कामं केली. पण तुम्हाला एकही ठेकेदार असा सापडणार नाही की मला काम मिळवण्यासाठी गडकरींकडे जावं लागलं. आता कुणाच्या मतदारसंघात काम केलं तर आधी आमदार काम थांबवतात. मी म्हणतो अरे तुमच्या मतदारसंघात काम करतोय. तर ते म्हणतात ‘वो कुछ नहीं. विकास, बिकास, भकास.. पेहेले माल दो, फिर काम लो’. मी इथे बसलेल्या आमदारांबद्दल बोलत नाही. नाहीतर तुम्ही भलतीकडे डोकं लावाल. मी बाहेरच्या आमदारांबद्दल बोलतोय”, अशा शब्दांत नितीन गडकरींनी सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
“राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”
“…मग पाच वर्षांत बघा कसा करंट लागेल”
दरम्यान, यावेळी नितीन गडकरींनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव घेऊन मिश्किल टिप्पणी केली. “तुम्ही फक्त एकदा मुनगंटीवारांना निवडून द्या, मग पाच वर्षांत बघा कसा करंट लागेल. ट्रिपल इंजिन लागल्यानंतर या मतदारसंघाचा विकास चार पटीने होईल”, असं ते म्हणाले.
“मी उगीच काहीतरी बोलणारा नेता नाही. कुणीही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाहीत. मैं जो बोलता हूँ, वही करता हूँ और जो करता हूँ, वही बोलता हूँ. तुम्ही सुधीर मुनगंटीवारांना निवडून पाठवा. त्यांच्यामागे मोदींची ताकद, माझी ताकद, ट्रिपल इंजिन.. असं पॉवरफुल शिलाजीत देऊ, की बस्स. विकासाचं काम एकदम जोरात होईल”, असं गडकरींनी म्हणताच उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला!