‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पापाठोपाठ ‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. विरोधकाकंकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे, तर विरोधकांच्या टीकेला सत्ताधारी नेत्यांकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. दरम्यान, गुजरातमधील वडोदरामध्ये हा प्रकल्प सुरू करणार असल्याची केंद्र सरकारकडून गुरुवारी घोषणा होण्याच्या साधारण तीन आठवड्यापूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी टाटा सन्सच्या विविध प्रकल्पांच्या विस्तारासाठी नागपुरमधील मिहान येथील जागा सूचवली होती.
या संदर्भात ७ ऑक्टोबर रोजी टाटा समूहाच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात नितीन गडकरींनी म्हटले होते की, “नागपुरमध्ये महाराष्ट्र सरकारने मिहान(मल्टि-मॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट नागपूर)मध्ये SEZ तयार केले आहे. मिहानमध्ये मुबलक प्रमाणात SEZ आणि बिगर SEZ अशी जमीन उपलब्ध आहे, ज्या टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तम आहेत.”
भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.
हेही वाचा : टाटा एअर बस प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाल्या…
गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी हा समारंभ होणार आहे. ‘‘या प्रकल्पातून भारतीय हवाई दलासाठी विमानांची निर्मिती होईल. तसेच तेथे तयार झालेल्या विमानांची निर्यातही होणार आहे. यामुळे भारतीय विमाननिर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे,’’ असे संरक्षण सचिव अजयकुमार यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस कंपनीशी २१ हजार कोटींचा करार केला होता. त्याअंतर्गत जुन्या अॅॅवरो-७४८ विमानांची जागा सी-२९५ ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. बडोद्यातील हा प्रकल्प २१,९३५ कोटी रुपयांचा असून येथे तयार होणारी विमाने प्रवासी वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकतात, अशी माहिती कुमार यांनी दिली. विमानाच्या ९६ टक्के भागांची निर्मिती भारतात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यात सध्यातरी विमानाच्या इंजिनाचा समावेश नाही.