नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा २०२०-२१ वर्षासाठीचा कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. १० फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नवी दिल्लीतील निवासस्थानी गडकरी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदारांना दिला जात होता. आता या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षाआड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत. रुपये ५० हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. हेमंत गोडसे, खा. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.

भाजपाचे नेते असलेले गडकरी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी, जलसंसाधन नदी विकास आणि गंगासंरक्षण मंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा विचार पुरस्कारासाठी करण्यात आला आहे. गडकरींनी ६० हजार कोटींची एक महत्वाकांक्षी योजना सरकारला सादर केली. या योजनेलाच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या नावाने ओळखले जाते. कृषी क्षेत्राशी देखील त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यांच्या पूर्ति ग्रुप ऑफ कंपनीजचा अनेक उद्योगांमधे समावेश आहे.

पुरस्कारासाठी त्यांची निवड खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार हेमंत टकले, पत्रकार सुरेखा टाकसाळे, जयप्रकाश पवार, अतुल कुलकर्णी, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ.शोभा नेर्लीकर, सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, डॉ. धर्माजी बोडके यांच्या निवड समितीने केली. सार्वजनिक वाचनालयाचे दिवंगत अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनीही निवड समितीत काम पाहिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari has been declared the efficient mp award msr