Nitin Gadkari : “करंट जाणवत होता, पण विश्वास वाटत नव्हता की…”; विधानसभेत महायुतीच्या विजयानंतर गडकरींची प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय ऐतिहासिक असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Nitin Gadkari News
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील यशानंतर नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो: नितीन गडकरी युट्यूब व्हिडीओ स्क्रिनशॉट)

Nitin Gadkari On Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रावादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या महायुतीने २८८ पैकी २३६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पिछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, ती अखेर संपली आहे. भाजपा आणि महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिक्रिया समोर आली आहे. गडकरींनी या विजयासाठी राज्यातील महायुतीच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला विजय ऐतिहासिक असल्याचे गडकरी म्हणाले आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं यश मिळालं. यामध्ये विदर्भात देखील चांगलं यश मिळालं. नागपूरमध्ये देखील जनतेने मोठ्या प्रमाणावर समर्थन दिलं”.

“महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार केला गेला होता. आम्हाला ४०० जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलवू, पण तो सगळा प्रचार चुकीचा होता, हे जनतेने या निवडणुकीतून सिद्ध केलं. या निवडणुकीतील सर्वात मोठी बाब ही राहिली की, शेतकरी, शेत मजूर, आदिवासी यांनी भरपूर प्रमाणात आम्हाला मतदान केलं. विशेषतः महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांनीदेखील उत्स्फूर्तपणे मतदान केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं”, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. मिळालेल्या जागांमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्ट्राइक रेट देखील उत्तम होता, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन करतो, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

हेही वाचा>> Maharashtra Election Winner Candidate List: भाजपाच्या विजयरथाची राज्यव्यापी घोडदौड, महायुतीला बहुमत; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!

पण विश्वास वाटत नव्हता की…

“महाराष्ट्रात फिरत असताना असा करंट जाणवत होता, पण विश्वास वाटत नव्हता की एवढं मोठं यश मिळेल. पण सर्व भागातून जनतेने युतीला जो कौल दिला आहे, तो अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा आहे. विशेषतः महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने आणि शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या महायुती सराकरने केलेल्या कामाला जनतेने पसंती दिली आहे”, असे नितीन गडकरी म्हणाले.

“या निवडणुकीने अनेक वाद आणि विवादांनाही उत्तर दिले आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा जातीपातींच्या राजकारणापासून मुक्त होऊन, एक सुखी, समृद्ध, संपन्न राज्य झाल्याशिवाय राहाणार नाही”, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले. निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल गडकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निवडून आलेल्या आमदारांचेही अभिनंदन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitin gadkari on maharashtra vidhan sabha election result mahayuti devendra fadnavis performance rak

First published on: 23-11-2024 at 19:14 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या